परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितल्यावर सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांना सुचलेले विचार !
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधक आणि साधक बनलेले धर्मप्रेमी यांना ‘श्री निर्विचाराय नमः’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘निर्विचार’ यांपैकी एक नामजप करायला सांगितला आहे. याविषयी चिंतन केल्यावर ‘साधकांना यांसारखे अन्य कोणते नामजप सांगू शकतो का ?’, याविषयी माझे झालेले चिंतन गुरुचरणी अर्पण करतो.
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगण्यामागे जाणवलेली कारणे
अ. परात्पर गुरु डॉक्टर काळानुसार साधकांना सगुणातून निर्गुणाकडे नेत आहेत.
आ. साधकांना भावपूर्ण नामजप करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
इ. साधकांच्या मनात विचारांचे काहूर माजत असल्यामुळे कोणताही नामजप भावपूर्ण करणे सध्या साधकांना शक्य होत नाही. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या मनात येणार्या विचारांवर मात करण्यासाठी त्यांना ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितला आहे.
साधक त्याचे चांगले परिणामही अनुभवत आहेत. हा नामजप विचारांच्या विरुद्ध आहे, म्हणजे हा नामजप मनातील विचारांना अवरोध करतो. त्यामुळे साधकांच्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून होत आहे.
२. साधकांच्या साधनेत नेहमी येणारे अडथळे न्यून होण्यासाठी ‘त्यांना कुठला नामजप सांगावा ?’, या प्रश्नावर सुचलेले काही नामजप !
‘साधकांना साधना करतांना नेहमी काही ठराविक प्रकारचे अडथळे येतात’, असे माझ्या लक्षात आले आहे. याची काही उदाहरणे आणि ‘ते अडथळे न्यून होण्यासाठी कोणता नामजप करायला हवा ?’, यांविषयी माझ्या मनात आलेले विचार पुढे दिले आहेत.
अ. अनेक साधकांच्या मनात काही वेळा नकारात्मक विचार येतात. साधकांच्या मनात नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढल्यास ते ‘सकारात्मक’ हा नामजप करू शकतात.
आ. काही प्रसंग घडल्यावर साधकांना निरुत्साह वाटून ‘काहीच करू नये’, असे वाटते. तेव्हा ते ‘उत्साह’ हा नामजप करू शकतात.
इ. काही जणांना लवकर राग येतो. तेव्हा ‘शांत’ असा नामजप करून रागावर नियंत्रण मिळवू शकतात आणि अहंच्या त्या पैलूवर स्वयंसूचना घेऊ शकतात.
ई. साधकांना इतरांकडून नेहमी अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाल्यावर त्यांना वाईट वाटते किंवा दुःख होते. अशा प्रसंगी ते ‘निरपेक्ष’ असा नामजप करू शकतात.
उ. काही कारणांनी आपली प्राणशक्ती अल्प झाली, तर आपण ‘चैतन्य’ असा नामजप करू शकतो.
ऊ. काही कारणाने आपल्याला दुःख झाले किंवा वाईट वाटत असेल, तर आपण ‘आनंद’ हा नामजप करू शकतो.
ए. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांविषयी विचार येऊन आपले मन अस्वस्थ होत असेल, तेव्हा आपण ‘वर्तमानकाळ’ असा नामजप करू शकतो.
वरील उपाय तात्कालिक आहेत. ‘मनाच्या त्या स्थितीतून लवकर बाहेर पडता यावे’, यासाठी हे नामजप १५ ते ३० मिनिटे करू शकतो; पण त्या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी गुरुमाऊलीने निर्मिलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवणे, हाच खरा उपाय आहे.’
– (पू.) अशोक पात्रीकर, ढवळी, फोंडा, गोवा, (२२.१०.२०२२)