रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार नवरात्रोत्सवात करण्यात आले देवींच्या कृपेसाठी होम !
हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, यासाठी होमांच्या वेळी करण्यात आला संकल्प !
रामनाथी, गोवा – हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे अन् सर्वत्रच्या साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, यासाठी महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत देवींच्या कृपेसाठी होम करण्यात आले. प्रत्येक होमाच्या शेवटी लघुपूर्णाहुती देण्यात आली. ‘होमांमध्ये नेहमीच्या इंधनांसमवेत गुळवेलही वापरावी, तसेच आहुतीच्या वेळी हिना आणि मरवा अत्तरही अर्पण करावे’, असे महर्षींनी सांगितले होते.
१. २६ आणि २७ सप्टेंबर या दिवशी नवार्ण मंत्राने हवन करण्यात आले. यज्ञाच्या आरंभी रूद्रांश हनुमंताशी संबंधित अंजनीय सहस्रनाम यामधील एक मंत्र म्हणत १०८ वेळा आहुती देण्यात आल्या
२. २८, २९ आणि ३० सप्टेंबर असे तीन दिवस प्रतिदिन एकत्रितपणे दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांनी हवन करण्यात आले.
३. १ ऑक्टोबर या दिवशी राजमातंगी होम, २ ऑक्टोबर या दिवशी ललिता त्रिपुरा सुंदरीदेवीचा होम, ३ आणि ४ ऑक्टोबर या दिवशी वाराही होम करण्यात आला, तर ५ ऑक्टोबर या विजयादशमीच्या दिवशी ललिता त्रिपुरासुंदरी होम आणि नवार्ण मंत्र होम करण्यात आला.
२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या सर्व होमांची एकत्रित महापूर्णाहुती ५ ऑक्टोबर या होमाच्या वेळी करण्यात आली. महर्षींनी सांगितल्यानुसार पूर्णाहुतीमध्ये पिंपळ, बेल आणि शमी या वृक्षांची पानेही अर्पण करण्यात आली, तसेच पूर्णाहुतीनंतर उपस्थित साधकांना सामवेदाचे मंत्र ऐकवण्यात आले.
प्रतिदिनच्या होमानंतर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांनी गायन आणि वादन सेवा सादर केली.
क्षणचित्र
सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या आई), त्यांच्या कन्या सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि नात सौ. सायली सिद्धेश करंदीकर (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कन्या) यांनीही (एकाच कुटुंबातील ३ पिढ्यांनी) गायनसेवा आणि देवीचा जोगवा भावपूर्णरितीने सादर केला.