रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधक शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचे निधन !
रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात मराठी भाषेतील लिखाण इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याची सेवा करणारे आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने २७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, लहान भाऊ आणि लहान बहिण आहे. सनातन परिवार देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
शिरीष देशमुख हे मूळचे संभाजीनगर येथील आहेत. शिरीष देशमुख हे पूर्वी दैनिक ‘लोकमत’मध्ये महाव्यवस्थापक होते. त्या वेळी त्यांचे विचार पुष्कळ वेगळे होते. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट झाला. साधनेसाठी उच्चभ्रू जीवनशैली त्यागून आश्रमजीवन अंगीकारणारे आणि दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) निकामी झाली असल्याने तीव्र शारीरिक त्रास भोगत असूनही प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावरी सोडा । चित्त (अंतर्मन) चैतन्याशी जोडा ।’ या भजनपंक्तीप्रमाणे अखंड अनुसंधानात राहून आनंद अनुभवणार देशमुख यांनी ९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त झाले होते. ते गेली ८ वर्षे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा आणि साधना करत होते. त्यांच्या गंभीर आजारपणातही आनंदी रहाणारे शिरीष देशमुख यांचा साधनाप्रवास आणि ज्ञानयोगाविषयी त्यांचे विचार यांवर आधारित ‘ज्ञानयोगी साधक श्री. शिरीष देशमुख’ हा ग्रंथही प्रकाशित झाला आहे.
जिज्ञासूवृत्तीचे श्री. शिरीष देशमुख !श्री. शिरीष देशमुख यांना अध्यात्मशास्त्रातील विविध सूत्रांतील बारकावे जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा होती. ते मला प्रश्न पाठवीत असत त्यावरून ते विभिन्न विषयांवर किती सखोल विचार करीत असत हे लक्षात येत असे. ते मी दिलेल्या उत्तरांचा नीट अभ्यास करीत असत आणि त्यावर त्यांचे झालेले चिंतन पुन्हा मला पाठवीत, त्यावरून हे सर्व केवळ तोंडदेखले नव्हते तर जाणून घ्यायची त्यांना खरोखरीच तळमळ असे हे लक्षात येत असे. – अनंत आठवले (२७.१०.२०२२) |
गंभीर आजारपणातही साधनेच्या बळावर आनंदी रहाणारे सनातनचे ज्ञानयोगी साधक (कै.) शिरीष देशमुख !‘मूळचे संभाजीनगर येथील श्री. शिरीष देशमुख उच्चविद्याविभूषित असून आरंभी त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळा’त आणि त्यानंतर दैनिक ‘लोकमत’मध्ये ‘मुख्य व्यवस्थापक’ म्हणून नोकरी केली. नंतर पत्रकारितेचे शिक्षण घेऊन त्यांनी वर्ष १९९२ मध्ये स्वतःचे ‘गोरज वार्ता’ या नावाचे सायंदैनिक चालू केले. नेतृत्वगुण अंगी असलेले श्री. देशमुख काही काळ राजकारणातही सहभागी होते. अध्यात्माची आवड असलेल्या श्री. देशमुख यांनी विविध आध्यात्मिक संस्थांचा अभ्यास केला. त्यानंतर ते जानेवारी १९९८ मध्ये सनातनचा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ वाचून प्रभावित झाले आणि त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. ‘व्यवसायापेक्षा सेवेत अधिक आनंद मिळतो’, अशी अनुभूती येत असल्याने त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार वर्ष १९९८ ते २००० या काळात मराठवाडा आणि विदर्भ येथे अध्यात्माच्या प्रसाराची सेवा केली. वर्ष २०१२ पर्यंत त्यांनी ‘धर्मकार्यासाठी विज्ञापने घेणे, गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करणे’ इत्यादी सेवा केल्या. नोव्हेंबर २०१३ पासून ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मुख्यत्वे सनातनच्या संकेतस्थळावरील मराठी भाषेतील लेख इंग्रजीत भाषांतर करण्याची सेवा करत होते. ‘चिकाटी आणि साधनेत प्रगती करण्यासाठी कष्ट करण्याची सिद्धता’, या गुणांमुळे आश्रमात आल्यावर त्यांनी स्वतःमध्ये अनेक चांगले पालट घडवून आणले. सप्टेंबर २०२१ पासून श्री. देशमुख ‘दोन्ही मूत्रपिंडे निकामी होणे’ या गंभीर आजाराने पीडित होते. त्यांची प्रकृती ज्ञानमार्गी होती. ज्ञानयोगाविषयीच्या जिज्ञासेमुळे त्यांनी सनातनने प्रकाशित केलेल्या पू. अनंत आठवले लिखित ‘गीतज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्माच्या विविध अंगांचा बोध’ या ज्ञानयोगपर ग्रंथांचा अभ्यास केला. सनातन सांगत असलेल्या गुरुकृपायोगामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग या तिन्हींचा सुयोग्य समन्वय साधला आहे. त्यामुळे आजारपणात श्री. देशमुख यांची ज्ञानयोगाप्रमाणेच कर्म आणि भक्ती या योगांनुसारही साधना झाली अन् त्यांनी ९.२.२०२२ या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांना ज्ञानयोगाविषयीची सूत्रे आतूनच स्फुरायची. सनातनच्या ‘सनातनचे ज्ञानयोगी साधक श्री. शिरीष देशमुख’ या ग्रंथात ही सूत्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. गंभीर आजारपणातही गुरूंवरील भाव आणि श्रद्धा यांमुळे ते सतत आनंदी होते. ‘स्वतःच्या देहाकडे साक्षीभावाने पहाता येणे, मायेतील गोष्टींचे आकर्षण न वाटणे, ‘मी परमात्म्याचाच अंश आहे’, याची जाणीव असणे’ इत्यादी ते अनुभवत होते. श्री. देशमुख यांच्या पत्नी (कै.) सौ. अरुणा शिरीष देशमुख यांनी मृत्यूपूर्वी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यांचा मुलगा श्री. जगदीश देशमुख आणि सून सौ. वंदना देशमुख हे दोघेही साधनारत आहेत. २६.१०.२०२२ या दिवशी दिवाळी संपली आणि २७.१०.२०२२ या दिवशी त्यांचे देहावसान झाले. त्यांनी साधकांना दिवाळीचा आनंद घेऊ दिला आणि दुसर्या दिवशी देह ठेवला. यातून त्यांच्यातील ‘मृत्यूच्या वेळीही साधकांच्या आनंदाचा विचार करणे’ आणि ‘प्रेमभाव’ हे गुण लक्षात येतात. ‘(कै.) शिरीष देशमुख यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२७.१०.२०२२) |
प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेले आणि साधनेसाठी स्वतःच्या विचारांत आमूलाग्र पालट करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !
१. उत्तम स्मरणशक्ती
‘वर्ष १९६९ ते वर्ष १९७१ या काळात देशमुखकाकांनी संत कबिरांचे दोहे ऐकले होते; मात्र ते त्यांच्या मनात नेहमीसाठी कोरले गेले आहेत.
२. अभ्यासू वृत्ती
अ. ‘पूर्वी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन केले होते; मात्र ते सनातन संस्थेमध्ये आल्यावर त्यांची एक वेगळीच घडण होत गेली. त्यांनी ‘भक्तीमार्गातून ज्ञानमार्गाकडे कसे जायचे ?’, याचा अभ्यास चालू केला.
आ. पू. भाऊकाका (पू. अनंत आठवले – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांचे ग्रंथही त्यांनी २ – ३ वेळा वाचले आहेत. त्यातून त्यांना ज्ञानमार्गाविषयीची परिपूर्ण माहिती मिळाली. गुरुकृपेमुळे ते त्यावर चिंतन करू शकले.
३. प्रगल्भता
अ. ज्ञानमार्गाचा अभ्यास करतांना ‘बुद्धी, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांची सांगड कशी घालायची ? आपल्या ज्ञानाचा वापर अध्यापनासाठी कसा करावा ?’, हे गुरुकृपेमुळेच त्यांना अवगत झाले. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लेख सिद्ध करतांना ‘त्यांच्या ज्ञानाचे (अनुभवाचे) लिखाण सर्वांना समजावे’, यासाठी ते प्रयत्न करतात.
आ. त्यांचे निरीक्षण चांगले आहे. त्यामुळे ते समोरच्याला एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात.
४. त्याग
श्री. देशमुखकाकांनी दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) या पदावर काम केले होते. आता ते साधनेच्या दृष्टीने रामनाथी आश्रमात रहायला आले आहेत. यातून त्यांनी ‘मायेतील विचारांचा, म्हणजे व्यावहारिक जीवनाचा त्याग केला आहे’, असे लक्षात येते.
५. साधनेसाठी मनाचा संघर्ष करणे
साधना करतांना त्यांना पुष्कळ संघर्ष करावा लागला. हे त्यांच्या दृष्टीने पुष्कळ कठीण होते, तरीही ते त्यावर मात करू शकले. ‘गुरुकृपाच सर्व पालट करू शकते’, हे त्यांच्या लक्षात आल्यावर आता त्यांना ‘आपले आयुष्य परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी घालवावे’, असे वाटते. ‘त्यांची कृपा आपल्यावर सदोदित असावी’, असे ते नेहमी चिंतन करतात.
६. श्री. शिरीष देशमुख यांच्यामध्ये जाणवलेला पालट !
६ अ. आवड-नावड न्यून होणे : पूर्वी त्यांचे मन खाण्याच्या पदार्थांमध्ये पुष्कळ अडकत असे; पण आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची (काकांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) निकामी झाली आहेत.) सर्व आवड-नावड पालटली आहे. आता त्यांना मीठ न घातलेले पदार्थ खावे लागतात. त्यांनी ते सर्व स्वीकारले आहे.’
– आधुनिक पशुवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२२)