ग्रहणकाळात शिर्डीसह देशातील अनेक मंदिरे बंद असल्याने भाविक देवदर्शनास मुकले !
मुंबई – २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण होतेे. ग्रहणकाळात शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरे सकाळपासून बंद होती, तर काही मंदिरे दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत बंद होती. काही मंदिरांनी ग्रहणकाळात देवतेची मूर्ती भाविकांना दिसू नये म्हणून त्यासमोर पडदा सोडला होता. वास्तविक ग्रहणकाळात अधिकधिक नामजप, तसेच धार्मिक कृत्ये करणे अपेक्षित असते. त्यामुळे भाविकांनी या कृती मंदिरात, तसेच मंदिर परिसरात केल्या असत्या, तर त्यांना याचा अधिक लाभ झाला असता; मात्र अनेक मंदिरांनी याचे शास्त्र जाणून न घेता अन्य काही उद्देशांनी मंदिरे बंद ठेवली. याचा तोटा असा झाला की, अनेक भाविक देवदर्शनास मुकले. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी धर्मजाणकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
सरकार आणि त्याने नेमलेले विश्वस्त हा ‘धर्मशास्त्रीय निर्णय’ घेणारा अनधिकृत स्रोत ! – वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष, धर्मसभा-विद्वत्संघ, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पीठ
२५ ऑक्टोबरला ग्रहणानिमित्त मंदिरांविषयी जी अव्यवस्था झाली, याला केंद्र आणि राज्य सरकार उत्तरदायी आहे. ग्रहणाचे वेध आणि पुण्यकाळ असे दोन काल किंवा विभाग असतात. यांपैकी वेध काळ हा सूतकाप्रमाणे पाळावयाचा असतो; मात्र साक्षात् ग्रहणकाळ ते ग्रहणोपरांत सूर्यदर्शनाचा काळ हा पुण्यकाळाप्रमाणे मानायचा असतो.
ग्रहण पुण्यकाळात स्नान, जप, दान आणि यज्ञ यांना विशेष महत्त्व असते. यासाठी तीर्थ-सरोवरे, नद्या, समुद्र ही स्थाने, तसेच मंदिरांची प्रांगणे ही विशेष महत्त्वाची असतात. असे असले, तरी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात कुठेही ग्रहण पुण्यकाळातील हिंदु धार्मिक कृत्यांसाठी स्नानाची, वस्त्र परिवर्तनाची, जप-दानाची, यज्ञासाठी आवश्यक स्वच्छतेची व्यवस्था पाणवठ्यांच्या ठिकाणी नसल्याने अनेक हिंदूंना निराशा आली, तसेच मंदिरांची प्रांगणे ही बंद ठेवल्याने अनेक हिंदू पुण्यास मुकले आहेत.
महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक मंदिरे, तीर्थ, सरोवरे, नद्या आणि समुद्र यांचे काठ केंद्र अन् राज्य सरकारांच्या कह्यात आहेत, तर काही धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहेत. ‘ही यंत्रणा स्वतःहून असे परस्पर चुकीचे निर्णय घेऊन मोकळी होते’, असे दिसते. केंद्र आणि राज्य सरकारे, तसेच धर्मादाय आयुक्तांकडून नियुक्त विश्वस्त धर्मशास्त्रीय निर्णय घेण्याविषयी ‘अनधिकृत’ असतात. त्यामुळे परंपरागत धर्मशास्त्रींकडून निर्णय घेऊन, स्थानिक संत-महंतांचे आशीर्वाद घेऊन, तसेच स्थानिक राजपरिवारांच्या सहभागाने कोणतीही धार्मिक व्यवस्था सरकार अन् विश्वस्त यांनी केल्यास २५ ऑक्टोबरला झाली, तशी अव्यवस्था होणार नाही. हिंदू जनता पुण्यास मुकणार नाही.