संभाजीनगर येथे वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर आजपासून दंडात्मक कारवाई चालू होणार !
संभाजीनगर – ३ वर्षांत वाहन अपघातात ३६ जणांचे बळी गेलेल्या वैजापूर-गंगापूर मार्गावर महामार्ग सुरक्षा पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. २८ ऑक्टोबरपासून सुरक्षित आणि सुखकर प्रवास करण्यासाठी वाहनधारकांमधे जनजागृती करणे, तसेच वाहतूक नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवणार्या वाहनचालकांवर पोलीस पथकाद्वारे पडताळणी करून धडक कारवाई करण्याची मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली.
संभाजीनगर ते नाशिक येथून मुंबईकडे जाण्यासाठी वाहनधारकांनी वैजापूर-गंगापूर मार्गाचा पर्याय निवडला आहे. या मार्गावर चारचाकी वाहनांच्या रहदारीच्या प्रमाणात काही मासांपासून लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण महामार्ग सुरक्षा पोलिसांनी नोंदवले आहे.