‘विशेष अन्वेषण पथका’ची स्थापना – एक सोपस्कार ?
जालना जिल्ह्यातील श्री समर्थ रामदासस्वामी यांचे जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावातील श्रीराम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या. या घटनेला २ मास उलटूनही चोरटे मोकाट आहेत. त्यामुळे याचे अन्वेषण करण्यासाठी ‘विशेष अन्वेषण पथका’ची स्थापना करण्यात आली आहे. २२ ऑगस्ट २०२२ या दिवशी चोरीला गेलेल्या दुर्मिळ मूर्तींचे अन्वेषण आतापर्यंत जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे होते; मात्र अन्वेषणात त्यांना यश न आल्याने ‘विशेष पथका’ची स्थापना करावी लागली. अन्वेषण होत नसल्याने समर्थ मंदिराचे विश्वस्त, मठाचे मठाधिपती, ग्रामस्थ, समर्थभक्त, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन प्रशासनाला २० नोव्हेंबरपर्यंतची समयमर्यादा दिली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस अन् राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन मूर्ती शोधून काढण्यासाठी निवेदन दिले. या वेळी त्यांनी सखोल अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर महासंचालकांच्या सूचनेवरून ‘विशेष अन्वेषण पथका’ची स्थापना करण्यात आली.
स्वत: समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापित केलेल्या देवतांच्या दुर्मिळ मूर्ती या सर्व समर्थभक्तांसाठी अमूल्य ठेवा आहेत. ‘मूर्तींचा शोध लागायला हवा’, या मागणीचा समर्थभक्तांनी जोर धरल्यावर काहीतरी हालचाल करत आहोत, हे दाखवण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे का ? चोरी झाल्यानंतर तब्बल २ मासांनी पथकाची स्थापना का केली ? शोध लागत नाही, तर पोलीस प्रशासनाने स्वत:हून अन्वेषणातील त्रुटी दूर करण्यासाठी लगेच कठोर पावले उचलली का नाहीत ? भक्तांनी मागणीचा जोर धरल्याविना पोलीस प्रशासन स्वत:हून काही हालचाल करणार नाही का ? राज्यशासनाने जांब समर्थ हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले असूनही चोरीला गेलेल्या मूर्तींचा शोध लागत नाही, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक मंदिरांतील मूर्ती चोरीला गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत; मात्र पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा शोध लागलेला नाही. पोलिसांसाठी या मूर्ती निर्जीव असल्या, तरी भक्तांसाठी त्या अनमोल रत्नच आहेत. त्यामुळे यापुढे हिंदूंनीच मूर्ती चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरट्यांना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा करावा !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर