‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला ५० सहस्र रुपयांचा दंड

चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल कायदा समर्थक’ म्हटल्याचे प्रकरण

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

नवी देहली – ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेचे समर्थक असल्याचे म्हटल्याने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या चर्चासत्राचा व्हिडिओ वाहिनीच्या संकेतस्थळावरून आणि अन्य सर्व मंचांवरून हटवण्याचाही आदेश दिला आहे.

१. या प्रकरणाची तक्रार इंद्रजीत घोरपडे यांनी केली होती. या तक्रारीनुसार ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीवर ६ एप्रिल २०२२ या दिवशी चर्चासत्रातील कार्यक्रमात सूत्रसंचालक अमन चोप्रा यांनी सहभागी मुसलमान सदस्यांच्या विरोधात विधाने केल्याचा आरोप होता. चोप्रा यांनी मुसलमान विद्यार्थिनींना ‘हिजाबी गँग’ आणि ‘हिजाबवाली गजवा गँग’, (गजवा म्हणजे विनाश)  ‘जवाहिरी गँग’ (जवाहिरी म्हणजे अल् कायदाचा माजी प्रमुख) अशा अर्थाचे शब्द वापरले होते. तसेच सहभागी मुसलमान अल् कायदाशी जोडले गेल्याचा आणि त्यांनीच हिजाब वाद उकरून काढल्याचा दावाही या कार्यक्रमात केला होता.

२. या आरोपांचे खंडण करतांना वाहिनीने म्हटले होते की, ‘हिजाबी गँग’ आणि ‘हिजाबवाली गजवा गँग’, ‘जवाहिरी गँग’ हे शब्द हे विद्यार्थिनींसाठी नव्हते, तर त्या मागच्या अदृश्य शक्तींसाठी होते; मात्र हा दावा ‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने फेटाळून लावला.

३. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे काही नियम ठरवून दिलेले आहेत. सूत्रसंचालकाने या नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्याने पुन्हा उल्लंघन झाल्यास चोप्रा यांना आमच्या समोर उपस्थित रहाण्याचा आदेश द्यावा लागेल, असेही ‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने म्हटले आहे.