राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त आमदारांना ८० लाखांची भेट !

मुंबई – राज्य सरकारने सर्व आमदारांना दिवाळीनिमित्त स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी ८० लाख रुपयांची भेट दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर २२९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आमदारांचा २ सहस्र ५१५ या लेखाशीर्षांतर्गत निधीतील मूलभूत सुविधांची कामे रहित केल्यानंतर हा निधी वितरित करून सरकारने आमदारांना दिलासा दिला आहे.

राज्यात २८७ विधानसभा आणि ६३ विधान परिषदेचे सदस्य आहेत. या सर्व आमदारांना स्थानिक विकासनिधीतील निधी संमत केला आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीवर १ सहस्र ४६८ कोटी रुपयांचा बोजा पडतो. एकाचवेळी मोठ्या निधीचा बोजा पडू नये; म्हणून प्रत्येक मासाला १० टक्के निधी वितरित करण्याचे धोरण ठरवण्यात आले होते. यापूर्वीच्या सरकारने मे, जून आणि ऑगस्टपर्यंतच्या निधीचे वितरण केले आहे. आता दिवाळीच्या काळात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या २ मासांचा निधी वितरित केला आहे. यानुसार प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.