शहरी नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नागपूर – नक्षलवाद अल्प होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास होत आहे. उद्योग चालू होत आहेत. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचे लक्ष आहे. शहरी नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना ते म्हणाले की, मंत्रीमंडळाचा विस्तार योग्य वेळी होईल. या विस्तारात विदर्भासह सर्वांचा विचार केला जाईल. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतांना माझे विकासाचे ध्येय होते. त्या वेळी मी प्रतिवर्षी गडचिरोली येथील पोलिसांसमवेत दिवाळी साजरी करत होतो. आज मी मुख्यमंत्री आहे; पण गडचिरोलीचा पालकमंत्री असतांना चालू केलेले काम मी अजूनही चालू ठेवले आहे. अतीदुर्गम भागात पोलीस नक्षलवाद्यांशी लढून स्वतःचे रक्षण करतात. त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा, हाच उद्देश आहे.