अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
प.पू. डॉक्टरांच्या सतत अनुसंधानात राहिल्यामुळे श्रीमती उषा बडगुजर यांना आलेल्या अनुभूती
१. सतत ‘परम पूज्य’ असे गुरुस्मरण केल्याने मनातील भीती उणावणे : ‘काही दिवसांपासून मला फार भीती वाटायची. मी ‘परम पूज्य, परम पूज्य’ असे गुरुमाऊलींचे सतत स्मरण करण्यास आरंभ केला. प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात राहिल्याने मला गुरुस्मरणाचा ध्यास लागला. झोपेत आणि जागे झाल्यावरही मला ‘परम पूज्य’ असेच शब्द ऐकू यायचे. ‘मनाला गुरुचरणी अर्पण केले आहे आणि तेच मला सांभाळत आहेत’, असा भाव देवाने माझ्या अंतर्मनात निर्माण केला. त्यामुळे ‘भीती उणावत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. घरातील कामे करतांना आसंदीवर बसलेले परम पूज्य सर्वत्र दिसणे आणि भाव जागृत होणे : मी परम पूज्यांना हाका मारून ‘या अज्ञानी जिवाला तुम्ही सांभाळा, तुमचे अस्तित्व मला २४ घंटे अनुभवता येऊ दे’, असे म्हणत होते. ५.४.२०२१ या दिवशी मी सकाळी झोपेतून उठल्यावर ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे…..’, हा सद्गुरूंचा श्लोक गुरुचरणी अर्पण केला. त्या वेळी मला परम पूज्य आसंदीवर बसलेले दिसले. मी घरातील सेवा, उदा. देवपूजा, स्वयंपाक, घरातील स्वच्छता, नामजप इत्यादी कृती करतांना मला सर्वत्र तेच दिसायचे. त्यामुळे माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होते आणि माझा गुरूंप्रतीचा भाव वाढून मला भावाश्रू येऊ लागले.
गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला हे अनुभवायास मिळाले, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जळगाव (८.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |