भारतासमवेतच्या व्यापारवृद्धीला विरोध करणार्‍या सुएला ब्रेव्हरमन पुन्हा झाल्या ब्रिटनच्या गृहमंत्री !

पंतप्रधान ऋषी सुनक आणि गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली. पंतप्रधान सुनक यांनी यापूर्वीच्या लिझ ट्रस सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान देत त्यांच्यावर गृहमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे. ऋषी सुनक आणि सुएला ब्रेव्हरमन हे दोघेही भारतीय वंशाचे आहेत. ब्रेव्हरमन यांनी काही दिवसांपूर्वी भारतासमवेतच्या मुक्त व्यापार कराराला विरोध दर्शवला होता.

ब्रेव्हरमन म्हणाल्या होत्या, ‘‘भारतासमवेत मुक्त व्यापार करार झाल्यास ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढेल. ‘व्हिसा’ संपल्यानंतरही अनेक प्रवासी देशाबाहेर जात नाहीत. यांमध्ये सर्वाधिक संख्या ही भारतियांची आहे.’’ यास भारताने विरोध दर्शवला होता. यावर ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवरली यांनी मात्र ‘भारतासमवेत मुक्त व्यापार करार करण्यास आम्ही उत्सुक आहोत’, असे स्पष्ट केले होते. ब्रेव्हरमन यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी यांची दिवाळीच्या कालावधीमध्ये हा करार अंतिम करण्यासाठीची ब्रिटन भेट रहित करण्यात आली असल्याचे सांगितले जात होते.

कोण आहेत सुएला ब्रेव्हरमन ?

४२ वर्षीय सुएला ब्रेव्हरमन बोरिस जॉन्सन सरकारमध्ये ‘अ‍ॅटर्नी जनरल’ होत्या. त्या हिंदू-तामिळ कुटुंबातील आहेत. त्यांचे पालक केनिया आणि मॉरिशस येथून ब्रिटनमध्ये आले. सुएला यांचा जन्म ३ एप्रिल १९८० या दिवशी लंडनमध्ये झाला. त्या वेम्बलीमध्ये वाढल्या असून त्यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे.

काय आहे मुक्त व्यापार करार?

भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार ४ लाख कोटी रुपयांचा आहे. मुक्त व्यापार करारानंतर करात मोठी सवलत मिळणार आहे. ब्रिटनने वर्ष २००४ मध्ये भारतासमवेत धोरणात्मक भागीदारी चालू केली. आतंकवाद, आण्विक व्यवहार आणि नागरी अंतराळ कार्यक्रमात त्यांनी भारताची बाजू घेतली. युनायटेड किंगडममध्ये १५ लाख भारतीय वंशाचे लोक आहेत. ते तेथील उत्पन्नामध्ये ६ टक्के योगदान देतात. तेथे अनुमाने १ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. युनायटेड किंगडम आणि भारत यांच्यातील व्यापार गेल्या दोन दशकांमध्ये तिप्पट वाढला आहे. गेल्या वर्षी भारताने ५१ सहस्र ५४ कोटी रुपयांची आयात केली होती, तर निर्यात ७९ सहस्र कोटी रुपयांची होती. सेवा क्षेत्रासह उलाढाल ३ लाख ८१ सहस्र कोटी रुपये आहे. यापूर्वीच्या ट्रस सरकारमधील अर्थमंत्री जेरेमी हंट यांना सुनक यांनी या वेळीही अर्थमंत्रीपद दिले आहे.