अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी !
मुंबई – ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे खच्चीकरण करणारे वृत्तांकन केल्याचा आरोप करत अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी दैनिक ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (आर.्एन्.आय.)’ कार्यालयाकडे, तसेच राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासाठी एस्.टी. कर्मचार्यांनी केलेल्या संपाचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी नेतृत्व केले होते. या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एस्.टी. कर्मचार्यांनी काढलेल्या मोर्च्याच्या प्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. या वेळी सदावर्ते यांना काही कालावधी कारागृहात रहावे लागले होते.