सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !
‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक यांचे दर्शन घ्यावे. या दौर्याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ओझर येथील ‘विघ्नेश्वर’ गणपतीचे घेतले दर्शन !
१. ओझरच्या विघ्नेश्वर मंदिराच्या पुजार्यांच्या घराण्यातील श्रीमती माधुरी जोशी यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विघ्नेश्वर मंदिर दाखवणे
‘ओझर येथील विघ्नेश्वराच्या मंदिरात पोचल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना मंदिर दाखवण्यासाठी ओझरच्या विघ्नेश्वर मंदिराच्या पुजार्यांच्या घराण्यातील श्रीमती माधुरी जोशी आल्या होत्या. देवद (पनवेल) येथील डॉ. दीपक जोशी (निसर्गोपचार तज्ञ)) यांनी श्रीमती माधुरी जोशी यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ओझरला येणार आहेत’, असे सांगितले होते. श्रीमती जोशी यांना अनेक आजार असूनही त्या अगदी उत्साहाने आल्या होत्या.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ओझरचा गणपति जेथे पहिल्यांदा प्रगट झाला, त्या स्थानाचे दर्शन घेतले.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत जुन्नर येथील साधकांनीही गणपतीचे दर्शन घेणे
या वेळी जुन्नर येथील साधक सौ. वंदना जोशी, त्यांचा मुलगा श्री. अमर जोशी (रामनाथी आश्रमात यज्ञ-याग करणारे पुरोहित) आणि मुलगी कु. मानसी जोशी यांनीही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत देवाचे दर्शन घेतले. देवदर्शन झाल्यावर त्या रात्री श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ मुक्कामाला जुन्नर येथे गेल्या.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१८.१०.२०२२)
विघ्नेश्वराचे स्थान आणि मंदिर प्रतिष्ठापनेचा इतिहास !
१. स्थान
‘पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओझरचा विघ्नेश्वर आहे. कुकडी नदीच्या तिरावर हे रमणीय स्थान आहे.
२. ओझर येथे अशी झाली विघ्नेश्वराची प्रतिष्ठापना !
‘सर्व विश्वातील संकटे, अरिष्टे, कुप्रवृत्ती आदींचा नाश व्हावा आणि सर्वत्र शांतता नांदावी’, या सद्हेतूंनी ऋषिमुनींनी हिमालयात एकत्रित गणेशयाग चालू केला होता. या यागात कोणत्याही देवतांना आवाहन केले नव्हते. या यागाला आपल्याला आमंत्रण नसल्यामुळे इंद्रदेवाने काळाला (यमाला) विघ्नासुराचे रूप देऊन ऋषींच्या गणेशयागात विघ्न आणण्यास पाठवले. विघ्नासुराच्या त्रासामुळे ऋषिमुनी त्रस्त झाले. नारदमुनींच्या मार्गदर्शनाने सर्व ऋषिमुनींनी ‘ॐ श्रीं ग्लों क्लीं गं ।’
या मंत्राने आणि दुर्वार्चनाने गणेश आराधना चालू केली. या मंत्रसामर्थ्यामुळे विघ्नासुराच्या उपद्व्यापाची वार्ता श्री गणेशाच्या कानावर गेली. जनसामान्य आणि ऋषिमुनी यांच्या हाकेला ‘ओ’ देऊन त्या यागातून गणेश प्रगट झाला. त्याच्या दर्शनानेच काळरूपी विघ्नासुर तेथून पळाला.
नंतर विघ्नासुर जुने नगर (जुन्नर) येथील कुकडी नदीच्या परिसरात वावरू लागला. येथे राहून हा विघ्नासुर परत सर्वांना त्रास देऊन कार्यात विघ्ने आणू लागला. त्यामुळे सर्वांनी भयभीत होऊन श्री गणेशाची आराधना चालू केली. यावर प्रसन्न होऊन श्री गणेशाने पुढे विघ्नासुराला जेरबंद केले. तेव्हा विघ्नासुर गणेशाला शरण आला आणि त्याने श्री गणेशाला प्रार्थना केली, ‘या स्थानावर गणेशाने ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ या नावाने कायम रहावे आणि आपल्यालाही तेथे स्थान मिळावे.’ त्यावर श्री गणेशाने त्याला सांगितले, ‘‘कुठल्याही कार्य शुभारंभी, तसेच मंगलसमयी माझे पूजन झाले, तर तुला विघ्न आणता येणार नाही, तसेच ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ या नावाचा सतत जप करणार्यांवर कुठलेही विघ्न येणार नाही.’’ एवढे सांगून गणपति अंतर्धान पावला. विघ्नासुर जायबंदी झाल्यामुळे सर्व ऋषिमुनी आणि देवता यांच्यावरील विघ्ने दूर झाली. या आनंदी क्षणाप्रीत्यर्थ सर्व देवतांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला दुपारी सूर्य माथ्यावर येण्याच्या वेळी येथे श्री विघ्नेश्वराची प्रतिष्ठापना केली. हा तोच ओझरचा विघ्नेश्वर होय.
३. कलात्मक घुमट आणि अप्रतिम नक्षीकाम असलेले विघ्नेश्वर मंदिर अन् शेंदूर लावल्यामुळे लाल रंगाची दिसणारी विघ्नेश्वर गणपतीची मूर्ती !
विघ्नेश्वर मंदिर आणि मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराभोवती दगडी तट आहे. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेले भालदार-चोपदार आणि ऋषिमुनी यांच्या मूर्ती आहेत. दरवाजाजवळ उंदीर आहे. विघ्नेश्वराला प्रदक्षिणा घालता येते. मंदिरासमोर दीपमाळा आणि एका ओवरीवर भैरवनाथाची मूर्ती आहे. मंडपात धुंडिराजाची मूर्ती, तसेच मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम असून घुमट कलात्मक आहे. मुख्य सभामंडपानंतर देवाचा गाभारा लागतो. विघ्नेश्वराची मूर्ती डाव्या सोंडेची आणि आसनस्थ पूर्णाकृती आहे. विघ्नेश्वराच्या डोळ्यांत माणिक, मस्तकी हिरा आणि नाभीत चकाकता खडा आहे. दोन्ही बाजूंना ऋद्धि-सिद्धि यांच्या मूर्ती आहेत. विघ्नेश्वराला शेंदूर लावल्यामुळे तो लाल रंगाचा दिसतो. मूर्तीभोवती शोभिवंत कमान आहे.’
(साभार : अष्टविनायक यात्रा, लेखक : डॉ. बी.पी. वांगीकर)
अष्टविनायकांना प्रार्थना !स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदःबल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिन्तामणिस्थेवरे । अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महड येथील ‘वरदविनायक’, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’, उत्तम वर देणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’, रांजणगावचा ‘महागणपति’ सर्वांवर सदैव कृपा करो ! |