‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवावी ! – योगेश सोमण, ज्येष्ठ अभिनेते, मुंबई
रामायण, महाभारत ही महाकाव्ये इतकी मोठी आहेत की, त्यांची कुणी टिंगल करावी म्हटले तरी होणार नाही. आज जर सहस्रो वर्षांपासून ते संस्कार रूपात आपल्यापर्यंत पोचत असतील आणि त्यांचे ‘आदिपुरुष’सारख्या चित्रपटांमधून विडंबन होत असेल, तर त्यातून त्या महाकाव्याला धक्का पोचत नाही; पण आपल्या धार्मिक भावना दुखावतात. अशा वेळी प्रेक्षकांनी त्या चित्रपटावर बहिष्कार टाकावा. ‘यू ट्यूब’वर ते वारंवार बघू नका, सोशल मिडियावर ‘लाईक’ (आवडले) वाढवू नका, त्याकडे दुर्लक्ष करा. ज्या प्रकारे डाव्या विचारसरणीचे लोक आतापर्यंत उजव्या विचारांचे साहित्यिक, कलावंत यांना अनुल्लेखाने मारतात, तेच धोरण आपणही अवलंबवावे. जसे कलावंताचे आविष्कार स्वातंत्र्य तुम्ही मान्य करता, तसेच प्रेक्षकांचेही ‘बॉयकॉट’ अर्थात् बहिष्कार हे आविष्कार स्वातंत्र्य आहे, ते मानायला हरकत नाही.
श्रद्धास्थानांची विपरित प्रतिमा दिसल्याने प्रेक्षकांची नकारात्मक प्रतिक्रिया येणे योग्यच !
पुराणातील श्रीराम आणि श्रीकृष्ण या देवता, छत्रपती शिवाजी महाराज अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे नायक किंवा रामायण, तसेच महाभारतातील खलपुरुषी पात्र असोत, त्यांची प्रतिमा आपल्या डोक्यात लहानपणापासून तयार झालेली असते, त्यानुसार आपल्या श्रद्धा निर्माण झालेल्या असतात. अशा श्रद्धेला ठेच पोचेल, असे विपरित काही दिसले, तर साहजिकच त्याविषयी राग येतो, वाईट वाटून भावना दुखावल्या जातात, हे होणे अगदी स्वाभाविक आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या ‘टिझर’ (चित्रपटाचा संक्षिप्त भाग)मध्ये आपल्या कल्पनेच्या अगदी विपरित श्रद्धास्थानांची प्रतिमा दिसते, तेव्हा आपल्या भावना दुखावतात. त्यामुळे जर यावरून जनक्षोभ उसळत असेल किंवा प्रेक्षकांची नकारात्मक प्रतिक्रिया येत असेल, तर ती योग्यच आहे. रामायणात श्रीरामाने रावणाचा सन्मान केला आहेच; कारण तो प्रकांड शिवभक्त आणि ज्ञानी पुरुष होता. असा रावण जर अल्लाउद्दीन खिलजीसारखा दाखवला, तर कुणालाही त्याचा राग येईलच.
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मितीमागे व्यापक कटाचा भाग असणे
रामायणावर जपानमध्ये बनवलेली ‘ऍनिमेटेड’ कलाकृती ‘आदिपुरुष’ चित्रपटापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. स्व. रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायणाच्या समांतर ते ‘ऍनिमेटेड’ रामायण केले असल्याचा भास होतो. यावरून ‘जपानमध्ये आपल्यापेक्षा चांगला रामायणाचा अभ्यास केला’, असे म्हणायला वाव आहे. ‘आदिपुरुष’सारखे चित्रपट कारण्यामागेही छुपा व्यावसायिक हेतू दडलेला आहे. पहिला खोडसाळपणा करायचा, त्याच्याविषयी विरोधी मत सिद्ध करायचे, नंतर लोकांना ते बघण्यासाठी उद्युक्त करायचे. अशा वेळी प्रेक्षक वर्गात एक असा मोठा भाग आहे, जो संबंधित चित्रपटाविषयी वाद निर्माण झाल्यामुळे त्या चित्रपटात काय दाखवले आहे ? हे उत्सुकतेपोटी बघायला जातो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येतील देशामध्ये ५ टक्के लोकांनी जरी असा विचार करून ते चित्रपट पहायला गेले, तरी त्यांचे कोट्यवधी रुपये वसूल होतात. हा चित्रपट काढण्यामागे व्यावसायिक धोरण, तसेच हा व्यापक कटाचा भागही असू शकतो. समाजातील उजव्या विचारांच्या लोकांचे जे आदर्शवत् व्यक्तिमत्त्व आहेत, त्यांची डाव्या विचारांचे लोक टिंगलटवाळी करतात. या चित्रपटाच्या विरोधात काही जण कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांना पाठिंबा दिला पाहिजेच आणि दुसरीकडे प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवावी.
(साभार : दैनिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, १७.१०.२०२२)