यमद्वितीयेचे रहस्य !
आज २६ ऑक्टोबर या दिवशी ‘यमद्वितीया’ आहे. त्या निमित्ताने…
‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे.
पुराणात अशी कथा आहे की, या दिवशी मृत्यूदेव यम याने स्वतःची बहीण यमुना हिच्या घरी जाऊन त्याने तिला वस्त्रालंकार देऊन तेथे मोठ्या आनंदाने भोजन केले. शास्त्रकारांनी या कौटुंबिक विधीस धर्माची जोड देऊन ‘हा दिवस ‘भाऊबीज’ म्हणून पाळणे, हे बंधुभगिनींचे श्रेष्ठ कर्तव्य आहे’, असे ठरवले.
भारतात सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास घरी बोलावून त्याला मंगलस्नान घालते. सुग्रास भोजन करून जेवावयास वाढते आणि स्वतःचा आनंद प्रकट करते. भाऊही तिला ओवाळणी घालत असतो. ‘भाऊ गरीब वा श्रीमंत असो, त्यास घरी बोलावून त्याला गोड करून खायला घालावे, त्याच्या संगतीत आनंद मानावा’, हा बहिणीचा हेतू असतो. ‘बहीण गरीब वा श्रीमंत असो, तिची विचारपूस करावी, तिच्या घरी जावे, तिची सुख-दुःखे समजावून घ्यावीत’, असे भावाला वाटत असते. असा हा भाऊबीजेचा दिवस आहे. बंधुभगिनींच्या उदात्त प्रेमाची प्रचीती याच दिवशी सर्वत्र पटत असते. एरव्ही व्यवहारात थोडाफार मतभेद झाल्यामुळे राग-लोभाचे प्रसंग येतही असतील; पण या दिवशी मात्र मनातील चुकीचे विचार लोप होऊन एका आनंदाचेच साम्राज्य बंधुभगिनींच्या प्रेमात असते. ज्यांना सख्खी बहीण नसते, ते चुलत, आते, मामे बहिणीकडून ओवाळून घेऊन भाऊबीज साजरी करतात.’
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’ लेखक : प्रल्हाद नरहर जोशी)
भाऊबीज (यमद्वितीया) : या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/621019.html
___________________________