गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !
कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथीला भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. त्या निमित्ताने…
‘कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले.
शरद ऋतु आरंभ झाला असतांना गोकुळातील सर्व लोकांनी इंद्राचा उत्सव करण्यास चालू केले. इंद्र हा मेघांचा राजा असून त्याच्याच कृपेमुळे संपूर्ण पृथ्वी सुजलाम् सुफलाम् होते. ही गोकुळवासियांची कल्पना होती; पण श्रीकृष्णाने सांगितले, ‘‘मेघवृष्टी होऊन पृथ्वी धन-धान्यांनी समृद्ध होते, यासाठी इंद्राचा उत्सव करणे योग्य नाही. येथून दिसणारी ही जंगले आणि गोवर्धन पर्वत यांपासूनच आपली उपजीविका होते. तेव्हा या पर्वताचे पूजन करणे इष्ट असल्याने तुम्ही गिरियज्ञ करण्यास प्रारंभ करा.’’ श्रीकृष्णाचे हे म्हणणे सर्वांना पटल्यावर सर्व गोपांनी गोवर्धन पर्वताचे पूजन केले आणि त्या पर्वताचा उत्सव केला. यामुळे इंद्रास फारच राग आला. त्याने गोकुळावर मुसळधार पावसाची वृष्टी करण्यास प्रारंभ केला. सर्व माणसे, पशु, पक्षी गांगरून गेले. दोन दिवस झाले, तरी पावसाचा मारा अल्प होईना. तेव्हा सर्व गोकुळवासीय श्रीकृष्णाकडे येऊन म्हणाले, ‘‘कृष्णा, तूच आमचे आता रक्षण कर.’’ त्यानंतर श्रीकृष्णाने सर्व म्हणणे ऐकून घेऊन गोवर्धन पर्वतच वर उचलला. तेव्हा त्याच्या खाली सर्व गोकुळ सुरक्षितपणे वाचले आणि त्यांना थोडासुद्धा त्रास झाला नाही. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’, लेखक : प्रल्हाद नरहर जोशी)