श्रीलंकेत ८ तमिळ हिंदू आरोपींना राष्ट्रपतींकडून क्षमा
‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’शी (‘लिट्टे’शी) संबंध असल्याचा होता आरोप !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ८ तमिळ हिंदू बंदीवानांना क्षमा करत त्यांची सुटका केली आहे. या सर्वांना ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’शी (‘लिट्टे’शी) संबंध असल्यावरून अटक करण्यात आली होती. ते सर्वजण रगेली काही वर्षे कारागृहात होते. यातील ३ जणांवर माजी राष्ट्रपती चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोप होता. त्यात ते दोषी ठरले होते. ते गेली २२ वर्षे कारावासात होते. त्यांची सुटका करण्यासाठी श्रीलंकेतील तमिळ राजकीय पक्ष आणि नेते सरकारवर दबाव निर्माण करत होते.
अन्य आरोपींना आतंकवाद नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. हा कायदा रहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्रीलंकेवर दबाव आणण्यात येत आहे. वर्ष २०२१ मध्ये युरोपिय संसदेने हा कायदा रहित करण्यास सांगितले होते. तेव्हा श्रीलंकेच्या सरकारने या संसदेला आश्वासन दिले होते की, ते या कायद्याचा वापर करणार नाही.