फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !
मुंबई – फटाक्यांमुळे राज्यात ३० हून अधिक आगीच्या घटना घडल्या. यांमध्ये अनेक जण घायाळ झाले. पुणे येथे फटाक्यांमुळे १७ मुले घायाळ झाली. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे राज्यात काही दुकाने, गोदामे यांना आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. २४ ऑक्टोबर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे राज्यात विविध ठिकाणी १७ हून अधिक आगीच्या दुर्घटना घडल्या.
संभाजीनगर येथे फटाक्यांमुळे एकूण १६ ठिकाणी आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या. मुंबईमध्ये साकीनाका येथेही एका गोदामाला आग लागली. यवतमाळ येथील राळेगाव शहरात असलेल्या क्रांती चौकातील ३ दुकानांना आग लागली. ठाणे जिल्ह्यात फटाक्यांमुळे ५ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. येथील उल्हासनगरमध्ये गोल मैदानाच्या परिसरातील हिरापन्ना इमारतीवर एका अज्ञात व्यक्तीने २४ ऑक्टोबरच्या उत्तररात्री रॉकेट सोडले. रॉकेट सोडतांनाचे चित्रीकरण करून या व्यक्तीने हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्याचा विकृतपणाही केला. पोलीस या युवकाचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाप्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल ! |