खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या ‘ऑनलाईन’ तिकीटदरांवर नियंत्रण ठेवण्यास परिवहन विभाग अपयशी !
|
मुंबई, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना तिकिटांचे दर एस्.टी. गाड्यांच्या दीडपटीपर्यंत वाढवता येऊ शकतात, असा शासनाचा आदेश आहे. खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या तिकीट नोंदणी केंद्रावर (‘बुकींग सेंटर’वर) सरकारच्या आदेशानुसार दीडपटीपर्यंत तिकीटदर आकारला जात आहे; परंतु ‘रेड बस’च्या अॅपवरून ऑनलाईन बुकींग करतांना त्याच गाड्यांसाठी दुपटीहून अधिक तिकीटदर आकारला जात आहे. ‘ऑनलाईन’ अधिक दर आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत परिवहन विभागाने (मोटार वाहन विभागाने) यातून स्वत:चे हात झटकले आहेत. त्यामुळे ‘कारवाई करायला कुणीच नसल्याने’ दिवाळीमध्ये प्रवाशांची ही लूट उघडपणे चालू आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने २३ ऑक्टोबर या दिवशी दादर (पूर्व) येथील वेगवेगळ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या नोंदणी केंद्रांवर (‘बुकींग सेंटर्स’वर) जाऊन मुंबईतून सुटणार्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या तिकिटांच्या दरांची माहिती घेतली. या वेळी हे तिकीटदर शासनाच्या दीपडपटीच्या नियमात बसत असल्याचे लक्षात आले. गाडीतील आसने भरतील त्याप्रमाणे तिकिटांचे दर वाढवण्यात येत असल्याचे; मात्र प्रवासी अल्प असल्यास तिकिटांचे दर उतरतही असल्याचे या वेळी आढळून आले.
‘रेडबस अॅप’वरील २५ ऑक्टोबरचे तिकीटदर आणि अन्य माहिती !
प्रवास मार्ग | एस्.टी. चा तिकीटदर (दिवाळीच्या कालावधीत केलेली १० टक्के दरवाढ धरून) | शासन नियमानुसार अधिकतम किती तिकीटदर आकारता येईल ? | ‘रेडबस अॅप’वरील तिकीटदर | नियमबाह्य आकारलेली अधिकची रक्कम |
मुंबई-कोल्हापूर | ९२४ | १३८६ | २०९५ (इंटरसिटी स्मार्ट बस) | ७०९ |
२३०० (श्री साई यलोझ) | ९१४ | |||
मुंबई – जळगाव | १०४० | १५६० | ४००० (पवार टूर्स अँड ट्रॅव्हल्स) | २४४० |
३००० (संगेतम ट्रॅव्हल्स अकोला) | १४४० | |||
मुंबई – नाशिक | ६५५ | ९८२ | २५०० (डॉफ्लीन ट्रॅव्हल्स हाऊस) | १५१८ |
२५०० (साई ट्रॅव्हल्स, चेंबूर) | १५१८ | |||
मुंबई – सोलापूर | ५४५ | ८१८ | ३००० (जगदंबा ट्रॅव्हल्स) | २१८१ |
३५०० (काकाजी ट्रॅव्हल्स) | २६८२ |
वरील सर्व तिकीटदर ‘रेडबस अॅप’वरील आहेत. या सर्वांचे ‘स्क्रीनशॉट’ दैनिक ‘सनातन प्रभात’कडे उपलब्ध आहेत.
परिवहन आणि सायबर विभाग यांचे दुर्लक्ष !
स्वत:च्या कार्यक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे खरेतर परिवहन विभागाने प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी पुढाकार घेऊन सायबर विभागाला कारवाईसाठी सूचित करणे अपेक्षित आहे; मात्र या दोन्ही विभागांनी दुर्लक्ष केल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या गाड्यांच्या ‘ऑनलाईन’ नोंदणीमधून प्रवाशांची लूट बिनबोभाट चालू आहे. या प्रकरणी काही नागरिकांना प्रतिक्रिया विचारल्या असता ‘खासगी टॅव्हल्सवाल्यांकडून अधिकार्यांना हप्ते पोचत असल्या’च्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
नागरिकांनो, ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवा !
खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अधिक तिकीटदर आकारण्यात आल्याविषयी ग्राहक मंचाकडे केलेल्या तक्रारींवरून यापूर्वी काही गुन्हे नोंदवून कारवाईही झाली आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून आर्थिक फसवणूक झाल्यास स्वत:चे तिकीट जपून ठेवून या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी.