हिंदु जनरेट्यापुढे झुकत आस्थापनांना त्यांच्या विज्ञापनांमध्ये पालट करणे भाग पडले !
हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी विशद केले ‘#NoBindiNoBusiness’ अभियानाचे यश !
नवी देहली – आतापर्यंत विविध आस्थापनांच्या दिवाळीसंदर्भातील विज्ञापनांमध्ये हिंदूंच्या सांस्कृतिक चिन्हांचा उपयोग केला जात होता; परंतु गेल्या ४-५ वर्षांतील विज्ञापनांत पणत्या, रांगोळ्या, फुले आणि त्यानंतर हिंदु स्त्रियांच्या कपाळावरील कुंकू गायब होत गेले. यातून या आस्थापनांनी ‘हिंदूंनी आमच्या उत्पादनांवर पैसे तर खर्च करायला हवेत; परंतु आम्ही तुमच्या धार्मिक चिन्हांचा आदर करणार नाही’, असेच अप्रत्यक्षपणे हिंदूंना बजावले. त्यांचा दिवाळीला एक ‘उपभोगवादी विकृती बनवायचा मानस आहे, ज्या अंतर्गत लोकांनी हिंदु धर्माच्या चिन्हांना झुगारून अविचारीपणे दिवाळीच्या भेटवस्तू विकत घेणे अपेक्षित आहे. त्यामुळेच मी ‘#NoBindiNoBusiness’ हा ट्रेंड चालू केला आणि पुढे ती हिंदु जनभावनाच झाली. हिंदु जनरेट्यापुढे झुकत अनेक आस्थापनांना त्यांच्या विज्ञापनांमध्ये पालट करणे भाग पडले’, असे वक्तव्य प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी केले. ‘प्रच्यम’ या हिंदुत्वनिष्ठ यू ट्यूब चॅनेलने त्यांचा हा व्हिडिओ प्रसारित केल्यावर तो यू ट्यूब, तसेच अन्य सामाजिक माध्यमांवरून लक्षावधी लोकांनी पाहिला.
१. वैद्य पुढे म्हणाल्या की, प्रत्येकाला वाटते की, तो एक (सुधारणावादी) कार्यकर्ता आहे. त्यातून हिंदूंना आणि केवळ हिंदूंनाच ज्ञान पाजळले जाते. ‘देवाला अभिषेक करतांना किती पाणी वापरायचे ?’, ‘कुणी मंदिरात गेले पाहिजे आणि कुणी नाही ?’, ‘हिंदूंनी किती फटाके वाजवायचे ?’, हे सर्व न्यायालयच ठरवू लागले आहे. अशा प्रकारचा पुरोगामीपणा कुठे थांबणार आहे ? आणि हे केवळ हिंदूंच्या सणांसंदर्भातच असे का ?
२. दुसरीकडे बकरी ईदला अवैधपणे होणार्या प्राणीहत्येचा निसर्गावर होणारा परिणाम यावर कोणतेही न्यायालय काहीच का बोलत नाही ? ‘ख्रिसमसच्या वेळी होत असलेली लक्षावधी वृक्षतोड’, ‘३१ डिसेंबरच्या रात्री उडवण्यात येणारे फटाके’ यांविरोधात चकार शब्दही काढला जात नाही. या फटाक्यांच्या माध्यमातून प्राणवायू सोडण्यात येतो का ? असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
३. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आम्हा हिंदूंचे सण हे तुमच्या (आस्थापनांच्या) सामाजिक कार्याचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) होऊ शकत नाही. केवळ भारतामध्येच तुम्ही दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाझ’ अथवा ‘तोहफा-ए-खास’ म्हणू शकता आणि तुम्हाला काही होत नाही; परंतु या वेळी या आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये पालट पहायला मिळत आहे. आता हिंदू त्यांचा अजेंडा सिद्ध करत आहेत आणि त्यानुसार आस्थापनांना वागावे लागत आहे. हा सर्वसाधारण हिंदूचा विजय आहे, जो म्हणतो, ‘आता पुरे झाले !’
या व्हिडिओची मार्गिका : www.youtube.com/watch?v=v7shjTJZVeQ
संपादकीय भूमिका‘#NoBindiNoBusiness’ अभियानातून शिकून हिंदूंनी हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवावा ! |