पिंपरी-चिंचवड (पुणे) पोलिसांच्या वाहनांसाठी २ कोटींचा निधी !
२०० जागांसाठी होणार भरती !
पिंपरी (जिल्हा पुणे) – शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील. आयुक्तालयाला नवीन वाहनांसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील. सायबर पोलीस ठाणे संमतीसाठीसुद्धा प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी शहर पोलीस दलाच्या अडचणी समजून घेऊन आढावा घेतला. या वेळी गुन्ह्यांचाही आढावा घेण्यात आला. शहर पोलीस दलातील मनुष्यबळ, गुन्हेगारीचे स्वरूप, सायबर क्राईम, गंभीर गुन्ह्यांतील अन्वेषण, पोलिसांची विशेष कामगिरी याविषयी सादरीकरण करण्यात आले.