निधर्मी पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपद्वारे ३ लाख मुसलमान कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार !
भाजपचे ‘मिशन २०२४’
नागपूर – भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची सिद्धता करण्यास आतापासूनच प्रारंभ केला आहे. निधर्मी पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. तब्बल ३ लाख मुसलमान कार्यकर्त्यांना भाजपच्या वतीने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून भाजप आपल्या कार्यकर्त्यांना सिद्ध करणार आहे. अपप्रचार करणार्यांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना या विशेष प्रशिक्षणातून धडे दिले जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना येथे दिली.
ते म्हणाले की, या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील १२ सहस्र अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. भाजप मुसलमानविरोधी असल्याचा अपप्रचार करणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना भाजपचे मुसलमान कार्यकर्ते उत्तर देतील. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सिद्ध करण्याचे प्रमुख उद्दिष्ट या प्रशिक्षणातून साध्य करण्याचा प्रयत्न असेल. प्रशिक्षण घेतलेले मुसलमान कार्यकर्ते अल्पसंख्यांक समाजाच्या घरोघरी जाणार आहेत.