‘गुमनामी बाबा’ यांच्या ‘डी.एन्.ए.’ची (अनुवांशिक गुणधर्म) माहिती देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाचा नकार !
नवी देहली – ‘गुमनामी बाबा’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस होते कि नाही ? ही माहिती मिळण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नकारामुळे दुरावली गेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या केंद्रीय फॉरेंसिक विज्ञान प्रयोगशाळेने (‘सी.एफ्.एस्.एल्.’ने) गुमनामी बाबा यांच्या डी.एन्.ए.च्या अहवालाची माहिती देण्यास नकार दिला आहे. एका माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागण्यात आली होती.
Central Forensic Laboratory refuses to share the DNA report of Gumnami Baba, believed to be Netaji Bose in disguise, sought in an RTI queryhttps://t.co/sYmHMPtgEW
— OpIndia.com (@OpIndia_com) October 22, 2022
१. सी.एफ्.एस्.एल्.ने नकार देतांना म्हटले की, देशाचे सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्राची सुरक्षा राजनैतिकता आणि आर्थिक हित यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो; म्हणून याविषयीची माहिती देता येणार नाही.
२. बंगालच्या हुगळी येथील कोन्नगरमधील सयाक सेन यांनी हा अर्ज केला होता. ते गुमनामी बाबा यांच्यावर संशोधन करत आहेत. सेन यांचे म्हणणे आहे की, उत्तरप्रदेशातील एका गावात रहाणार्या गुमनामी बाबाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके का आहे की, ज्यामुळे त्यांच्याविषयीची ही माहिती उघड केल्याने देशात अस्थिरता माजेल ? त्यामुळे यातून हे स्पष्ट संदेश मिळतात की, गुमनामी बाबा एक सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा अधिक काहीतरी होते. माझ्या सर्व निष्कर्षानुसार गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते.
गुमनामी बाबा कोण होते ?
१८ ऑगस्ट १९४५ या दिवशी तैवान येथील विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला होता; मात्र काही जणांचा दावा आहे की, ते या वेळी विमानात नव्हते. ते ब्रिटिशांपासून लपण्यासाठी अज्ञातवासात राहिले. उत्तरप्रदेशातील अयोध्या, बस्ती आदी ठिकाणी गावांमध्ये त्यांच्यासारखेच दिसणारी साधूच्या वेशातील व्यक्ती लोकांना दिसून आली. त्यांच्याविषयी कोणतीही माहिती नसल्याने त्यांना ‘गुमनामी बाबा’ म्हणून लोक ओळखू लागले होते. वर्ष १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.