श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा आश्रमात श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्या विविध दीपरचनांद्वारे श्री सिद्धिविनायकाची आराधना करण्यात आली. दिव्यांचा लखलखता प्रकाश लक्ष वेधून घेतो. दिव्यांच्या या सुंदर दीपरचना नयनमनोहारी आहेत. या केवळ आकर्षक दीपरचना नसून या सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार आहेत ! संतांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधिकांनी केलेल्या या दीपरचनांच्या माध्यमातून भगवंताने अध्यात्मातील विविध पैलूंचे दालनच जिज्ञासूंसाठी खुले केले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासह त्यांची काही वैशिष्ट्ये येथे जाणून घेऊया !
१. दीपरचनांमधील चैतन्यामुळे छायाचित्रांमध्ये जिवंतपणा जाणवणे
दीपरचनांची छायाचित्रे पहातांना ‘आपण त्या रचना प्रत्यक्षच पहात आहोत’, असे वाटते, इतका त्यांत जिवंतपणा आहे. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम मुळातच चैतन्यमय आहे. अशा आश्रमात देवतातत्त्व आकृष्ट होण्याच्या उद्देशाने केलेल्या सात्त्विक आणि सुबक दीपरचनांमध्येही चैतन्य आले आहे. (‘छायाचित्र क्रमांक १, ३ आणि ४’ पहा.) चैतन्यामुळेच छायाचित्रे इतकी सजीव दिसत आहेत.
२. पणत्यांच्या ज्योती अत्यंत तेजस्वी आणि चैतन्यमय दिसणे
सामान्यतः अल्प प्रकाशात काढलेल्या छायाचित्रात दिव्याच्या ज्योतीभोवती प्रकाशकिरण अथवा विविध रंगांच्या छटा दिसून येतात. सनातनच्या आश्रमात लावलेल्या या पणत्यांच्या ज्योतींची काही वैशिष्ट्ये दिसून आली. पणत्यांच्या ज्योती अत्यंत तेजस्वी आणि चैतन्यमय दिसतात, तसेच ज्योतींभोवती एकसमान आकारात प्रकाशकिरण दिसून येतात. (‘छायाचित्र क्रमांक २’ पहा.)
३. आश्रमातील तेजतत्त्व आणि आपतत्त्व यांमुळे परावर्तन अन् लाटांप्रमाणे तरंग आलेल्या लादीवर दिव्यांचे दिसणारे सुंदर प्रतिबिंब
आश्रमातील स्वागतकक्षातील लादी तेजतत्त्वामुळे प्रकाशाचे परावर्तन करणारी झाली आहे, तसेच आपतत्त्वामुळे काही लाद्यांवर पाण्यातील लाटांप्रमाणे दृश्य दिसते. केवळ प्रकाशाचे परावर्तन वाढलेल्या लादीवर सुस्पष्ट प्रतिबिंब दिसते, तर परावर्तनाच्या गुणासह लाटांप्रमाणे दृश्य दिसण्याचा गुण आलेल्या लाद्यांवर एकाच वस्तूचे प्रतिबिंब अनेक वेळा अत्यंत सुस्पष्ट दिसते. त्यामुळे छायाचित्र क्रमांक ५ मध्ये ( ‘छायाचित्र क्रमांक ५’ पहा.) पणतीच्या एका ज्योतीचे प्रतिबिंब ४ वेळा दिसते. जणू पणत्यांच्या अनेक रांगा लावल्या आहेत !
उत्तर भारतात गंगा नदीची पूजा करून तिच्या प्रवाहात दीप सोडले जातात. अनेक भाविकांनी दीप अर्पण केल्यामुळे गंगेचे ते विशाल पात्र दिव्यांनी उजळून निघते. गंगेच्या त्या लखलखत्या पात्राप्रमाणेच दिव्यांचे हे प्रतिबिंब भासत आहे !
दीपरचनेसारख्या सजावटीच्या कृतीचेही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्मीकरण केले आहे. कलेची सेवा करणार्या सनातनच्या साधिका कु. अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), कु. सिद्धि महेंद्र क्षत्रिय (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सौ. मैत्रेयी भूषण कुलकर्णी, सौ. साधना राजू सुतार आणि अन्य साधिका सण-उत्सवांच्या वेळी त्या त्या देवतातत्त्वाला पूरक असलेल्या आकारांच्या दीपरचना करण्यासाठी प्रयत्न करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या शिकवणीमुळे साधिकांच्या कलात्मकतेला परिपूर्णतेची आणि भक्तीभावाची जोड लाभली आहे. त्यामुळे या रचना अत्यंत सुबक आणि मनोहारी दिसतात. त्यांना सनातनच्या आश्रमातील चैतन्याचा स्पर्श झाल्यामुळे दीपरचनांमध्येही ईश्वरी तत्त्व जागृत होते. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
दीपज्योतींप्रमाणे साधकांचे साधनादीपही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपावर्षावाने उजळावे, ही प्रार्थना !
– कु. पूनम साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१६.८.२०२२)
दीपरचनांमधील स्पंदनांचे प्रमाणसनातनच्या आश्रमातील दीपरचनांची छायाचित्रे पहातांना विविध आध्यात्मिक अनुभूती आल्या. त्यांतील स्पंदनांच्या प्रमाणावरून त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात येतील. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.८.२०२२) |