अयोध्या भारतवर्षाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे सुवर्ण प्रतिबिंब ! – पंतप्रधान

१५ लाख ७६ सहस्र दिव्यांनी उजळली अयोध्या !

अयोध्या : रामाच्या चरणी मोदींच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्या ही भारतवर्षाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे सुवर्ण प्रतिबिंब आहे. ‘रामो राजमणि सदा विजयते ।’ म्हणजेच रामरूपी सदाचाराचाच विजय होत आला आहे. आध्यात्मिक प्रकाशच भारताच्या भौतिक प्रगतीचे पथप्रदर्शन करणार आहे. दीप हा आशादायी आहे, तो उष्माही देतो आणि आगही ! तो स्वत: जळतो आणि अंधारालाही जाळतो. जेव्हा आपण स्वार्थाच्या वर उठून परमार्थाच्या मार्गावर जातो, तेव्हा आपण सर्वसमावेशक बनतो. ‘इदं न मम ।’ असे आपण म्हणतो. हीच भारताची चिरंतन संस्कृती आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील शरयू नदीच्या तिरावर असलेल्या ‘राम की पैडी’ येथे आयोजित ऐतिहासिक दीपोत्सव कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यातील अन्य मंत्री आणि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. संपूर्ण अयोध्यानगरी १५ लाख ७६ सहस्र दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आली होती. या माध्यमातून अयोध्येने सर्वाधिक दिवे लावणारा गेल्या वर्षीचा स्वत:चाच विक्रम मोडून नवीन विश्‍वविक्रम प्रस्थापित केला.

१. या मंगलप्रसंगी पंतप्रधान पुढे म्हणाले की, मध्यकाल आणि आधुनिक काळातही आपल्याला अंध:काराला सामोरे जावे लागले. या कालावधीत कितीतरी संस्कृती नष्ट झाल्या; परंतु भारताने स्वत:च्या पराक्रमाच्या बळावर सर्व आक्रमणे झेलली. भारताने दीप प्रज्वलित करणे सोडले नाही. हेच आपल्या संस्कृतीचे महत्त्व आहे !

२. अयोध्येत आल्यावर पंतप्रधानांनी आरंभी रामललाचे दर्शन घेतले. त्यानंतर रामजन्मभूमीवर पुनर्उभारणी होत असलेल्या भव्य श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. १४ जानेवारी २०२४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे. या वेळी पंतप्रधानांनी शरयू नदीची आरतीही केली.

३. भव्य ‘लेझर शो’द्वारे ‘रामकथा सुखदायी’ या गीतावर प्रभु श्रीरामांच्या सूंपर्ण चरित्राचे सुंदर चित्रण करण्यात आले. या ‘शो’द्वारे श्रीरामचंद्रांविषयी उत्कट भाव जागृत करणारी भजनेही ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे ऐकवण्यात आली.