नरक चतुर्दशी
१. तिथी
आश्विन कृष्ण चतुर्दशी
२. इतिहास
‘श्रीमद्भागवतपुराणात एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर (नरकासुर) नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या १६ सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. श्रीकृष्णाला हे समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार मारून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.’
३. सण साजरा करण्याची पद्धत
अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.
आ. यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.
इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.
ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.
नरक चतुर्दशी : संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/620783.html
________________________