ऐन दिवाळीतही मोटार वाहन (परिवहन) विभागाच्या ‘ऑनलाईन’ तक्रारीची ‘लिंक’ आणि ‘अॅप’ नादुरुस्तच !
सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !
मुंबई – मोटार वाहन (परिवहन) विभागाच्या ‘https://transport.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर ‘नागरिक सेवा’ या शीर्षकाखाली प्रवाशांना ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी ‘लिंक’ ठेवण्यात आली आहे; मात्र मागील काही मासांपासून ही ‘लिंक’ उघडतच नाही. तसेच विभागाने तक्रारीसाठी निर्माण केलेले ‘RTO Maharashtra App’ हे ‘अँड्रॉईड अॅप’ही बंद आहे. किमान दिवाळीपूर्वी तरी प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठीची व्यवस्था कार्यरत होईल, असे वाटत होते; मात्र विभागाच्या भोंगळ कारभारामध्ये अद्यापही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे ‘मोटार वाहन (परिवहन) विभाग प्रवाशांच्या हितासाठी चालवला जात आहे कि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या लाभासाठी ?’, हाच प्रश्न आता पडत आहे.
१. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी ‘संकेतस्थळांवर ‘ऑनलाईन’ अधिक दर आकारल्यास त्यांवर कारवाई करता येत नाही’, असे कारण मोटार वाहन (परिवहन) विभागाकडून पुढे करण्यात येते. ‘नागरिकांनी तक्रार केल्यास कारवाई करण्यात येईल’, अशी भूमिका परिवहन विभागाकडून घेण्यात येत आहे.
२. राज्यातील प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयांकडून तक्रार नोंदवण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये काही कार्यालयांनी तक्रारींसाठी स्वतंत्र भ्रमणभाष क्रमांक दिले आहेत, तर काहींनी कार्यालयांच्या दूरध्वनीवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मोहिमेमुळे भोंगळ कारभार उघड !
राज्यात खासगी बुकींग सेंटरच्या ठिकाणी शासनमान्य तिकीटदराची पत्रके लावलेली नाहीत. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी राज्यातील विविध प्रादेशिक तथा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे संपर्क केले असतांना बहुतांश ठिकाणचे संपर्क क्रमांक बंद स्थितीत असल्याचे, तर काही कार्यालयांतील दूरध्वनी कुणी उचलतच नसल्याचे आढळून आले. तक्रारीसाठी दिलेल्या आणि कार्यालयीन दूरध्वनी यंत्रणा बंद आहेत. संकेतस्थळांवरील तक्रारीसाठी दिलेली ‘लिंक’ नादुरुस्त आहे. तक्रार नोंदवण्यासाठी असलेले ‘अॅप’ही बंद आहे. असे असतांना मागील अनेक मासांपासून केवळ प्रसिद्धीपत्रक काढून तक्रारीचे आवाहन करण्याचा सोपस्कार मोटार वाहन विभागाकडून चालू आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ने राबवलेल्या लोकहितकारी चळवळीमुळे मोटार वाहन (परिवहन) विभागाचा हा सर्व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
संपादकीय भूमिका
|