बेळगाव शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने बेळगाव महापालिकेला १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड !
बेळगाव – बेळगाव शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने राज्य शासनाच्या विधीमंडळ समितीने बेळगाव महापालिकेला १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्याच्या विधीमंडळ समितीची बेंगळुरू येथे बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापालिकेचे पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी उपस्थित होते. दंडाची ही रक्कम महापालिकेला राज्य वित्त आयोगाकडून मिळणार्या निधीतून कपात केली जाणार आहे. दंडाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम सांडपाणी प्रक्रिया, तसेच भुयारी गटार योजनेसाठी वापरली जाणार आहे. (एकीकडे ‘स्मार्ट सिटी’साठी प्रयत्न करणार्या बेळगाव महापालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने १ कोटी ८० लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणे हे लज्जास्पद आहे ! गणेशोत्सव कालावधीत भाविकांना प्रदूषण होऊ नये म्हणून श्री गणेशमूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन करण्यापूर्वी महापालिकेने अगोदर स्वत:चे आत्मपरीक्षण करावे ! – संपादक)