गुजरातमध्ये दिवाळीच्या काळात वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरावा लागणार नाही ! – गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा
कर्णावती (गुजरात) – २१ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीचे नियम मोडले, तर त्यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड वसूल केला जाणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या संमतीने मी हा निर्णय घेतला आहे; पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही वाहतुकीचे नियमच पाळायचे नाहीत. तुम्ही जर काही चूक केली, नियम मोडले, तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही, अशी घोषणा गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळेच भाजप सरकारकडून असा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
No fine for flouting traffic rules in Gujarat during Diwali, announces state govt https://t.co/Om45TtpwTt
— Republic (@republic) October 22, 2022
१. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. तेथे दारू पिऊन गाडी चालवल्यास १० सहस्र रुपये दंड किंवा ६ मासांच्या कारावासाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास २५ सहस्र रुपये दंड किंवा ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. सिग्नल तोडल्यास १ सहस्र ते ५ सहस्र रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
२. राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंतसिंह चौधरी यांनी आरोप केला की, राज्यातील भाजप सरकार लोकांचे प्राण धोक्यात घालत आहे. निवडणूक आयोग निवडणुका घोषित करण्यास उशीर करत आहे; कारण सरकारला अशा प्रकारच्या घोषणा करता येतील.
संपादकीय भूमिकावाहतुकीचे नियम जनतेच्या आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी असतात. ‘ऐन सणांच्या वेळी त्यावरील दंड माफ केल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढू शकते आणि यात लोकांचा जीव जाऊ शकतो’, याचा विचार कोण करणार ? |