पुणे येथे नियमांचे उल्लंघन करणार्या १९२ खासगी बसगाड्यांवर कारवाई, १५ लाखांचा दंड वसूल !
पुणे – राज्य सरकारने घोषित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खासगी बसचालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, म्हणजेच एस्.टी. गाड्यांच्या भाडेदरापेक्षा दीडपट भाडे अधिक आकारण्याची मुभा आहे; मात्र त्यापेक्षा अधिक भाडे खासगी बसचालक आकारू शकत नाहीत. सणासुदीच्या काळात गावी जाणार्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते. या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम चालू केली आहे. या मोहिमच्या वेळी आर्.टी.ओ.चे नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले आणि बसमध्ये प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत आम्ही ३३८ वाहनांची तपासणी केली असून १९२ खासगी बसचालकांवर कारवाई केली आहे आणि १४ लाख ९६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
पुण्याहून नागपूरला जाणार्या मीनल देव यांनी सांगितले की, ‘स्लीपर कोच’मधील आसनासाठी माझ्याकडून ६ सहस्र रुपये भाडे आकारण्यात आले. ‘लक्झरी बस’चे सामान्य भाडे अनुमाने १ सहस्र ५०० रुपये असते; मात्र सणासुदीच्या गर्दीमुळे माझ्याकडून चारपट अधिक शुल्क आकारण्यात आले.
भुसावळ मार्गावर चालू असलेल्या कामामुळे अनेक आगगाड्या (ट्रेन) रहित करण्यात आल्याने खासगी बसचालक त्यांची लूट करत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींनंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियमांचे उल्लंघन करणार्या सर्व खासगी बसचालकांना दंडात्मक कारवाईची चेतावणी दिली आहे.