ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ होऊ नये, यासाठी कोतवडेवासीय राबवणार स्वाक्षरी मोहीम !
|
कोतवडे (रत्नागिरी) – समस्त ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू आणि जागृत देवस्थान ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ला कदापि अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी समस्त कोतवडेवासियांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. काही ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून गावातील सर्व वाड्यांतून ग्रामपंचायतीला निवेदन देऊन ‘परमिट रूम’ ला अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येणार आहे.
ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीवरील श्रद्धेपोटी प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ स्वाक्षरी मोहिमेसाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत आहेत. गावातील अनेक युवकही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच सरपंच, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री उदय सामंत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मंदिराजवळ ‘परमिट रूम’ ला अनुमती मिळू नयेे, अशी मागणी केली आहे.
मद्याचे दुकान, बीअर शॉप आणि आता ‘परमिट रूम’ची मागणी !
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ अनिल नेवरेकर यांनी प्रारंभी मद्याचे दुकान चालू केले होते. त्यानंतर त्यांनी बीअर शॉपी चालू केली आणि आता त्यांनी ‘परमिट रूम’ चीही मागणी केली आहे. परमिट रूम झाल्यावर भविष्यात मंदिराजवळ ते ‘डान्सबार’ ही चालू करण्याची मागणी करतील, अशी शक्यता ग्रामस्थांनी निवेदनात व्यक्त केली आहे. ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ ‘परमिट रूम’ असणे, हे ग्रामपंचायतीसह सर्व ग्रामस्थांसाठी लाजिरवाणे ठरेल, तसेच गावाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणारे असेल, असेही ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
गावाच्या नावलौकिकात बाधा येेणार नाही, याची दक्षता घ्यावी !
नेवरेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी थाटलेल्या ‘बीअर शॉपी’ च्या ठिकाणी येणारे मद्यपी श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात मद्य पितात. मंदिराच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये मद्याच्या रिकाम्या बाटल्या फेकतात. मंदिराच्या आवारात दिवसाढवळ्या मद्यपींचा वावर वाढला आहे. श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री साईबाबा मंदिर या दोन्ही मंदिरांच्या जवळ त्यांनी मांसाचे पदार्थ असलेले ‘चायनीज’ चे दुकानही घातले आहे. या सर्व प्रकारांमुळे मंदिरांचे पावित्र्य भंग होत आहे. श्री महालक्ष्मीदेवीचे स्वयंभू स्थान, श्री कुसुमेश्वरदेवाचे जागृत देवस्थान, तसेच ‘संत दासगणू महाराज यांचे मूळगाव’ असा कोतवडे गावचा नावलौकिक आहे. या नावलौकिकाला बाधा येणार नाही, याची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी, असे आवाहनही या निवेदनातून करण्यात आले आहे.
कोतवडे येथील स्वयंभू श्री महालक्ष्मीदेवी ही अनेक कुटुंबियांची कुलदेवता आहे. त्यामुळे केवळ गावातीलच नव्हे, तर महाराष्ट्र आणि राज्याबाहेरूनही अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. ‘मंदिरात येणार्या सर्व भाविकांना आध्यात्मिक लाभ व्हावा’, यासाठी मंदिरातील पावित्र्य टिकवून ठेवण्याचे दायित्व देवस्थान, ग्रामपंचायत, तसेच सर्व ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे मंदिराच्या जवळ असलेली नेवरेकर यांची ‘बीअर शॉपी’ आणि ‘चायनीज’चे दुकानही तेथून हटवावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनामध्ये केली आहे. सर्व वाड्यांतून ही निवेदने ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहेत. मंदिराजवळ ‘परमिट रूम’ होऊ नये, यासाठी देवस्थानाकडून ग्रामपंचायतीसह वरिष्ठ पातळीपर्यंत पत्रव्यवहार करावा, असे मत गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केले.