ताजमहालचे अन्वेषण करण्याविषयीची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !
नवी देहली – ‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणारे भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली. ‘ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. या याचिकेमध्ये ताजमहालच्या परिसरातील २२ खोल्या उघडून त्यांचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती एम्.आर्. शाह आणि न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश यांच्या खंडपिठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
१. उच्च न्यायालयाने १२ मे २०२२ या दिवशी म्हटले होते की, रजनीश सिंह जे भाजपचे अयोध्येचे माध्यम प्रमुख आहेत. या याचिकेला ‘दायित्वशून्य’ पद्धतीने ‘जनहित याचिका’ या नावाखाली प्रविष्ट करण्यात आले, असे सांगत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्यालाही सुनावले होते.
२. याचिकेमध्ये ‘प्राचीन, ऐतिहासिक स्मारक, तसेच पुरातत्व स्थळ आणि अवशेष (राष्ट्रीय महत्त्व) अधिनियम, १९५१’ आणि ‘प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम, १९५८’ यांच्या काही प्रावधानांना वेगळे करण्याची मागणी करण्यात आली होती, ज्यांतर्गत ताजमहल, फतेहपूर सीकरी, आगर्याचा किल्ला आणि इत्माद-उद-दौला याचे थडगे ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते.