२५.१०.२०२२ या दिवशी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !
१. सूर्यग्रहण दिसणारे देश
‘आश्विन अमावास्या (२५.१०.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह आशिया खंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोप खंड, आफ्रिका खंडाचा पूर्वाेत्तर प्रदेश या प्रदेशांत ग्रहण दिसेल.
२. खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती सावली ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. सूर्यबिंब कंकणाच्या (स्त्रियांच्या हातातील बांगडीच्या) आकारात झाकले गेले, तर दिसणार्या ग्रहणाला ‘कंकणाकृती ग्रहण’ म्हणतात. कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसत नाही; परंतु सूर्याबाहेरचा भाग बांगडीसारखा चमकतो. सूर्यग्रहण अमावास्येच्या दिवशी होते.
३. भारतात सर्वत्र दिसणार्या सूर्यग्रहणाच्या वेळा
३ अ. हे ग्रहण २५.१०.२०२२ या दिवशी सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे.’ (साभार : दाते पंचांग)
३ आ. सूर्यग्रहणाच्या वेळा (या वेळा मुंबई येथील आहेत.)
३ आ १. स्पर्श (आरंभ) : २५.१०.२०२२ या दिवशी सायंकाळी ४.४९ वाजता
३ आ २. मध्य : २५.१०.२०२२ या दिवशी सायंकाळी ५.४३ वाजता
३ आ ३. मोक्ष (शेवट) : सूर्यास्तापर्यंत. २५.१०.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.०८ वाजता
३ इ. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : १ घंटे १९ मिनिटे
टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ‘ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.
३ ई. पुण्यकाल : ‘हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल. त्यामुळे भारतात कुठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही; म्हणून स्थानिक वेळेनुसार (त्या त्या गावातील) स्पर्शकालापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.’
(साभार : दाते पंचांग)
३ उ. ग्रहणाचे वेध लागणे
३ उ १. अर्थ : सूर्यग्रहणापूर्वी सूर्य चंद्राच्या छायेत येऊ लागतो. त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.
३ उ २. कालावधी : ‘हे सूर्यग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात (टीप २) लागत असल्याने मंगळवारी २५.१०.२०२२ या दिवशी पहाटे ३.३० वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त आणि रुग्णाईत व्यक्ती यांनी, तसेच गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी दुपारी १२.३० वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत.’ (साभार : दाते पंचांग)
टीप २ : एक प्रहर ३ घंट्यांचा असतो. दिवसाचे ४ आणि रात्रीचे ४ प्रहर मिळून एका दिवसात एकूण ८ प्रहर असतात.
४. सूर्यग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम
‘वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य आणि श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन करणे निषिद्ध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत; मात्र पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि विश्रांती घेणे, ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्वकाळात, म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबई वेळेनुसार दुपारी ४.४९ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.०८ वाजेपर्यंत) मात्र पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग आणि झोपणे ही कर्मे निषिद्ध असल्याने करू नयेत.’ (साभार : दाते पंचांग)
४ अ. आरोग्याच्या दृष्टीने वेधनियम पाळण्याचे महत्त्व !
४ अ १. शारीरिक आणि भौतिक या स्तरांवर : वेधकाळात जिवाणूची संख्या वाढत असल्याने अन्न लवकर खराब होते. या काळात रोगप्रतिकार शक्ती न्यून असते. ज्याप्रमाणे रात्रीचे अन्न दुसर्या दिवशी शिळे होते, त्याप्रमाणे ग्रहणापूर्वीचे अन्न ग्रहणानंतर शिळे मानण्यात येते. त्यामुळे ते अन्न टाकून द्यावे. केवळ दूध आणि पाणी यांना हा नियम लागू नाही. ग्रहणापूर्वीचे दूध आणि पाणी ग्रहण संपल्यावरही वापरू शकतो.
४ अ २. मानसिक स्तरावर : वेधकाळात मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ‘काही व्यक्तींना निराशा येणे, ताण वाढणे इत्यादी मानसिक त्रास होतात’, असे मानसोपचार तज्ञ सांगतात.
५. ग्रहणकाळात साधना करण्याचे लाभ
ग्रहणकाळात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते. यासाठी ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. वेधारंभापासून ग्रहण संपेपर्यंत नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास त्याचा लाभ होतो.
६. ग्रहणकालातील वर्ज्यावर्ज्य कृती
६ अ. वर्ज्य कृती : ‘ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मल-मूत्रविसर्जन, अभ्यंग (संपूर्ण शरिराला कोमट तेल लावून ते शरिरात जिरेपर्यंत मर्दन करणे), भोजन, खाणे-पिणे आणि कामविषयाचे सेवन ही कर्मे करू नयेत.
६ आ. ग्रहणकालात कोणती कर्मे करावीत ?
१. ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.
२. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे.
३. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरश्चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते.
४. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे.
५. एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.
७. ग्रहणाचे राशीपरत्वे फल
७ अ. शुभ फल : वृषभ, सिंह, धनु आणि मकर
७ आ. अशुभ फल : कर्क, तुला, वृश्चिक आणि मीन
७ इ. मिश्र फल : मेष, मिथुन, कन्या आणि कुंभ
ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे सूर्यग्रहण पाहू नये.’ (साभार : दाते पंचांग)
८. सूर्यग्रहण पहातांना घ्यावयाची काळजी
कंकणाकृती आणि खंडग्रास सूर्यग्रहण पहातांना ग्रहण पहाण्यासाठी बनवलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा सूर्याचे प्रखरकिरण डोळ्यांपर्यंत पोेचू नयेत, यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करूनच ग्रहण पहावे. कोणत्याही कारणास्तव नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नये. ग्रहणाची छायाचित्रे काढणार्या व्यक्तींनी विशिष्ट ‘फिल्टर’चा उपयोग करूनच छायाचित्रे काढावीत; अन्यथा त्यांच्या डोळ्यांना हानी पोचू शकते.
९. ग्रहणातील स्नानाविषयी माहिती
‘ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे, तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक, पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वहाते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ आणि पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदास्नान करणे शक्य नसल्यास स्नानाच्या वेळी नर्मदेचे स्मरण करावे.’ (साभार : दाते पंचांग)
१०. मोक्षस्नान आणि भोजन यांविषयी
‘या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नाही; तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्ष वेळेनंतर म्हणजे सायंकाळी ६.३२ नंतर मोक्षस्नान करावे आणि दुसर्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे.’ (साभार: दाते पंचांग)
११. सूर्यग्रहणात साधनेचे महत्त्व
ग्रहणकालातील विशेष वातावरणाचा परिणाम प्रत्येक सजीवावर होतो. चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहणाचा काळ साधनेसाठी अधिक पोषक असतो. ज्योतिष, धार्मिक आणि वैज्ञानिक या स्तरांवर ग्रहणकाल महत्त्वाचा मानला आहे. ग्रहणकाल हा संधीकाल असल्याने या काळात केलेल्या साधनेचा परिणाम लगेच जाणवतो. ग्रहणकालात जप आणि दान करणे यांचे महत्त्व अनंत पटींनी आहे. यासाठी ग्रहणमोक्षानंतर आपल्या ऐपतीनुसार दान करावे. सूर्यग्रहणात नवीन मंत्र घेण्यास आणि मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकालामध्ये केल्याने मंत्र सिद्ध होतो. सूर्यग्रहणात श्री गुरूंचे अनन्यभावे स्मरण करून पूर्ण श्रद्धेने, एकाग्र मनाने केलेल्या जपाने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि व्यवहारिक त्रास नष्ट होतात. सर्व कार्यात सफलता मिळते. ग्रहणकालात जप करण्यासाठी माळेची आवश्यकता नसते. ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतची संपूर्ण वेळ अतिशय महत्त्वाची असते.’
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.