भरती आणि ओहोटी यांचा स्वयंपाकावर होणारा परिणाम !

बर्‍याच जणांच्या मनात ‘भरती आणि ओहोटी यांचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?’, असा प्रश्न येतो. खरेतर याचे उत्तर ‘हो’, असे आहे. ते कशावरून ? हे स्पष्ट करणारा लेख येथे देत आहोत.

१. भरती किंवा ओहोटी यांच्या वेळेला पदार्थ तळल्यास त्यावर परिणाम होणे

एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे, शंकरपाळे केल्यावर तो पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी पुष्कळ सारे तेल जमते आणि ते पदार्थही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण तेच असते; परंतु त्या पदार्थांत पुष्कळ तेल शोषले जाते. बटाटेवडे, भजी केली, तर कधी कधी ते पुष्कळ तेल शोषतात. याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.

जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला, तर तेल अल्प लागते आणि पदार्थही छान होतो अन् आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.

२. भरती किंवा ओहोटी यांची वेळ काढण्याची पद्धत आणि पदार्थांवर प्रत्यक्ष होणारा परिणाम

भरती किंवा ओहोटी यांची वेळ कशी काढावी ? ती पद्धत पुढीलप्रमाणे असून दिवसाची तिथी वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच; पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहे.

‘कालनिर्णय’वर आजची तिथी बघावी, उदाहरणार्थ आजची तिथी कृष्ण २ आहे. तिथी २ ÷ ३/४ = १.५. आता १.५ म्हणजे दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण ३ घंटे आधी तळण चालू करावे (सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत); पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला प्रारंभ केला, तर जसजशी वेळ पुढे जाईल, तसतसे पदार्थ अधिक तेल शोषेल.

जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू, तेव्हा ही वेळ पाळली, तर पदार्थात तेल न्यून शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात.
– श्री. अवधूत वेलणकर

३. भरती किंवा ओहोटीच्या वेळी तेल अल्पाधिक शोषण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण

३ अ. अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी जलतत्त्व अधिक कार्यरत असणे : भरतीच्या वेळेस ‘हायड्रोफिलिक फोर्सेस’ (जलविरोधी क्रिया) अधिक कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरिरात असलेले ५-६ लिटर द्रव पदार्थ, रक्त, ‘हार्मोन्स’ (ग्रंथीरस) यांवर सुद्धा परिणाम होतो. पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमी या तिथींना हे फोर्सेस अधिक कार्यरत असतात. म्हणून मानसिक आजार असलेल्यांना वेडाचे झटके किंवा अंगात येणे, चिडचिड करणे असे प्रकार होतात. त्यामुळे अंगातील द्रवरूप आणि पाणी असलेले ‘हार्मोन्स’ वर-खाली होत असल्याने या तिथींना स्वभावावर अधिक परिणाम होतो. याच तत्त्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस अल्प-अधिक पडणे आणि देवतांचे शक्तीतत्त्व अधिक कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी अन् पौर्णिमा या दिवशी घडतात; कारण जलतत्त्व अधिक कार्यरत असते.

३ आ. भरतीच्या वेळी जलतत्त्व पुष्कळ कार्यरत असल्याने मनाची चंचलता आणि निराशा न्यून करण्यासाठी मिठाच्या पाण्याने अंघोळ करावी : मन चंचल, उद्विग्न, निराश वाटत असेल, तर मूठभर मीठ कोमट पाण्यात घालून अंघोळ करावी. भरतीच्या वेळी जलतत्त्व पुष्कळ कार्यरत असल्याने अधिक सुलभतेने मीठ विरघळू शकते. मिठातील ‘NaCl’ (सोडियम क्लोराईड) मध्ये शरीर आणि मन यांतील ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) शक्ती खेचण्याची असते; कारण मीठ पाण्यात विरघळले की, आयन्स् (प्रभारित अणू) सिद्ध होऊन ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरिरातही वीजवहन सतत चालू असते. मिठाचे पाणी अधिक पातळ आणि गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यासही साहाय्यभूत ठरते. यास्तव भरतीच्या वेळेस बालदीत मीठ पाण्यात घालून अंघोळ केल्यास मनःशांती लाभू शकते.

३ इ. भरती आणि ओहोटी यांच्या वेळी पदार्थाने तेल अन् पाणी अल्पाधिक शोषण्यामागील कारण : भरतीच्या वेळेत तळणीचे तेल हे पाण्याच्या विरुद्ध धर्माचे (हायड्रोफोबिक – जलविरोधी) असल्याने त्याचे शोषण पदार्थात न्यून होते. तेव्हा पाण्याचे शोषण करण्याची पदार्थाची वृत्ती (हायड्रोफिलीक – जलप्रिय) असते. याउलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक इफेक्ट) आणि पृथ्वीवरील जलतत्त्वाचा परिणाम न्यून होऊन तैली पदार्थ (हायड्रोफोबिक इफेक्ट) वाढतो. त्यामुळे ओहोटी लागली की, तळण अधिक तेल पीत असणार. याच तत्त्वाने खिचडी, आमटी, वरण, भाजी करतांना भरतीच्या वेळेस न्यून शिट्ट्यांमध्ये शिजते, तर ओहोटीच्या वेळेस अधिक वेळ लागू शकतो.

४. देवीदेवतांनी अष्टमी वा पौर्णिमा या तिथीला अवतार घेण्यामागील तत्त्व

याच तत्त्वाने अधिकाधिक शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवीदेवता अष्टमी वा पौर्णिमा या तिथीला अवतार घेतात, उदाहरणार्थ चैत्र पौर्णिमेला हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस श्रीकृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिवशक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय इत्यादी.

त्यामुळे या लिखाणातील ‘पदार्थ तळणे आणि भरती-ओहोटी’ ही माहिती शास्त्रीय असून त्यात जुनाट, खोटे किंवा अंधश्रद्धा वगैरे काही नाही, हे लक्षात ठेवा.

– श्री. सागर बर्वे, कोथरूड, पुणे.

(साभार : सामाजिक माध्यम)