लिज ट्रस पायउतार !
ब्रिटनमध्ये ६ आठवड्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदी निवडून आलेल्या हुजूर पक्षाच्या लिज ट्रस यांनी २ दिवसांपूर्वी आश्चर्यकारकरित्या त्यागपत्र दिले आहे. त्या केवळ ४५ दिवस पंतप्रधानपदी राहू शकल्या. ब्रिटनच्या लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत अल्प कालावधीच्या त्या पंतप्रधान ठरल्या. त्यांच्या पक्षाचेच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करून त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या त्यागपत्राच्या पूर्वी भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही त्यागपत्र दिले आहे. त्यांच्या पूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी राहिलेले बोरिस जॉन्सन यांनीही त्यागपत्रच दिले होते. आता पंतप्रधानपदासाठी बहुतेकांचे लक्ष हे ऋषी सुनक यांच्याकडे लागले आहे; मात्र लिझ ट्रस यांच्या त्यागपत्रामुळे ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
विश्वास गमावलेल्या ट्रस !
ब्रिटनमध्ये महागाईचा दर कधी नव्हे, तो सर्वाधिक वाढला आहे. हा दर गत ४० वर्षांमध्ये अधिक आहे. कोरोनाच्या संकटामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. उत्पादन घटले आहे. व्यापारावर परिणाम झाला आहे. जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. परिणामी करकपात करण्याचा निर्णय बोरिस जॉन्सन यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच मंत्रीमंडळातील अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक यांनी त्यागपत्र देऊन विरोध दर्शवला होता. सुनक यांच्या पाठोपाठ अन्य मंत्र्यांनीही त्यागपत्र दिले होते आणि जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले. त्याचा राग मनात असल्यामुळे जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या सुनक आणि लिज ट्रस यांच्यापैकी ट्रस यांना पाठिंबा दिला अन् त्या निवडून आल्या. ट्रस यांनी जनतेला करकपातीचे आश्वासन दिले होते; मात्र लघु अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याला मंत्रीमंडळातून विरोध होऊ लागला. त्यातच गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी भारताशी मुक्त व्यापाराच्या धोरणाला विरोध केला. त्यामुळे त्यांच्याविषयीची अप्रसन्नता हुजूर पक्षात होती. परिणामी त्यांना त्यागपत्र द्यावे लागले. भारताशी मुक्त व्यापाराचे धोरण बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या भारतभेटीच्या वेळी मांडले होते. सध्या ब्रिटन आणि भारत यांच्यातील ‘मुक्त व्यापार करारा’च्या वाटाघाटी चालू आहेत. हा करार अस्तित्वात येण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त ठरला होता; मात्र ट्रस यांना ब्रिटनची आर्थिक घडी सुधारणारा हा करार करण्यात अपयश आले.
अव्यवहार्य करकपात
जनतेला करकपात करण्याचे आमीष जॉन्सन आणि ट्रस यांनी दाखवले, तरी ‘ब्रिटनच्या सध्याच्या स्थितीत करकपात व्यवहार्य नाही’, असे सुनक यांना वाटते. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि प्रचंड महागाई अल्प करण्यासाठी जनतेवरील करकपात करणे, हा मार्ग असू शकत नाही; मात्र कर कपात केल्याने जनतेचा रोष काही काळासाठी अल्प होईल. ‘जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी अल्प पडले’, असे ट्रस यांनी सांगितले असले, तरी त्या अव्यवहार्य करकपातीवरच भर देत होत्या. त्या पंतप्रधान झाल्यापासून महागाईने उच्चांक गाठला. लोकांचा हुजूर पक्षाच्या विरुद्ध संताप वाढत होता. परिणामी त्यांना त्यांच्या पक्षातूनच अंतर्विरोध चालू झाला होता. जनतेच्या विरोधामुळे अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांनाही त्यागपत्र द्यावे लागले. त्यामुळे अर्थमंत्रीपदी जेरमी हंट यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचाही लाभ न होता, ब्रिटनची अर्थव्यवस्था कोलांटउड्या खात खाली खाली जात राहिली. ‘ट्रस यांचे निर्णय आर्थिक आणि सामाजिक अस्थिरता अधिक तीव्र करणारे होते’, असे त्यांच्या पक्षातील नेत्यांना वाटते. त्यामुळे हे निर्णय विवादास्पद ठरले. पक्षांतर्गत विरोधही वाढला होता. तसेच करकपातीवरून पक्षातच दोन मतप्रवाह झाले आहेत. परिणामी पक्षांतर्गत कलह वाढला आहे. ब्रिटनमध्ये ट्रस पंतप्रधान होण्यापूर्वीच्या आधी घेतलेल्या सर्वेक्षणात सुनक यांना पंतप्रधानपदासाठी दावेदार मानण्यात येत होते; मात्र वर्णद्वेष आणि वंशवाद यांचा प्रभाव ब्रिटीश जनतेवर आहे. तसेच ‘मूळची ब्रिटीश नसलेली आणि ज्यावर ब्रिटनने राज्य केले, त्या भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटिशांना कशी चालणार ?’ त्यातच सुनक यांनी करकपात न करण्याचे सूत्र लावून धरल्यामुळे ट्रस यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ ब्रिटीश जनतेने घातली, तरी ती लवकर तुटली.
कठोर निर्णय आवश्यक
ब्रिटन सध्या ज्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीतून जात आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी अन्य मार्गांचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. ‘ब्रेक्झिट’ म्हणजे ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला, तरी अजून ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती प्रक्रिया तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्ट्या गुंतागुंतीची आहे, तसेच ‘या प्रक्रियेचा सामाजिकदृष्ट्या काय परिणाम होणार ?’ याविषयीही ब्रिटनमध्ये तेवढी सुस्पष्टता नाही. एकेकाळी जगावर राज्य करणार्या आणि ज्यांच्या साम्राज्यात सूर्य कधीही अस्ताला जात नाही, अशी स्थिती असणार्या ब्रिटनची आज दीन अवस्था झाली आहे. ऋषी सुनक यांची धोरणे व्यवहार्य आहेत. मोठ्या आस्थापनांवर अधिक कर लादून सरकारी तिजोरीत वाढ करणे, करकपात स्थगित करणे असे निर्णय सुनक घेऊ इच्छितात. ते जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांना आर्थिक विषयांची अधिक जाण आहे. त्यांची पत्नी म्हणजे ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती (ज्यांची संपत्ती ब्रिटनच्या राणी एवढीच किंवा त्याहून अधिक आहे) यांना ते कर भरण्याची जाणीव करून देतात. त्यातच गेल्याच मासात भारताच्या अर्थव्यवस्थेने ब्रिटनसारख्या अर्थसंपन्न राष्ट्राला जागतिक क्रमवारीत मागे टाकले आहे. असे सुनक पंतप्रधानपदी निवडून आल्यास भारताचा स्वाभिमान जागृत होईल; मात्र ब्रिटिशांचा दुखावेल. असे असले तरी ‘भारतियांविना ब्रिटनला गत्यंतर नाही’ हे ब्रिटिशांना उमजेल तो सुदिन !
ब्रिटनची आर्थिक आणि राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याविना गत्यंतर नाही हे निश्चित ! |