श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सवत्स गायीचे पूजन केल्यावर गाय अन् तिचे वासरू यांवर झालेला सकारात्मक परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
आज आश्विन कृष्ण एकादशी (२१ ऑक्टोबर २०२२) या दिवशी असलेल्या वसुबारसच्या निमित्ताने…
‘भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांच्या आज्ञेने २५.९.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सवत्स गायीचे (ज्या गायीने वासराला जन्म देऊन ७ दिवसांपेक्षा अल्प दिवस झाले आहेत, अशा गायीचे) पूजन सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्या हस्ते करण्यात आले. अशा पूजनाला ‘उभय गोमुखी दान’ असे म्हणतात. या पूजनामुळे कामधेनूचा आशीर्वाद मिळतो, तसेच ग्रहपीडा असल्यास ती दूर होते. गायीचे वैशिष्ट्य म्हणजे ती सगळे त्रास स्वतःवर घेते आणि ते नष्ट करते. ‘सद्गुरुद्वयींनी सवत्स गायीचे पूजन केल्यावर गाय अन् तिचे वासरू यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत पूजनापूर्वी आणि पूजनानंतर गाय अन् तिचे वासरू यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
१ अ. सद्गुरुद्वयींच्या हस्ते सवत्स गोपूजन झाल्यानंतर गाय आणि तिचे वासरू यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : गाय आणि तिचे वासरू यांच्यामध्ये पूजनापूर्वी अन् पूजनानंतरही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. गाय आणि तिचे वासरू यांच्यामध्ये पूजनापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. सद्गुरुद्वयींच्या हस्ते सवत्स गोपूजन झाल्यानंतर गाय अन् तिचे वासरू यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. हिंदु धर्मात ‘गोवत्स द्वादशी’ला सवत्स गायीचे पूजन केले जाणे : आश्विन कृष्ण पक्ष द्वादशीला ‘गोवत्स द्वादशी’ म्हणतात. त्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया ‘वसुबारस’ हे व्रत करतात. ‘समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या’, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. ‘या आणि पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात अन् पूजा करत असलेल्या गायीच्या शरिरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे’, या उद्देशाने हे व्रत केले जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)
२ आ. सद्गुरुद्वयींनी सवत्स गायीचे पूजन केल्यावर ती गाय आणि तिचे वासरू यांच्याकडे पुष्कळ प्रमाणात चैतन्य आकृष्ट झाल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : गायीमध्ये देवतांची तत्त्वे आकृष्ट करून घेऊन ती प्रक्षेपित करण्याची क्षमता असते. गाय मुळातच सात्त्विक असल्याने तिच्यात, तसेच तिच्या वासरात पूजनापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. सवत्स गायीचे पूजन महर्षि भृगु यांच्या आज्ञेने केले असल्याने त्यासाठी महर्षि भृगु यांचा संकल्प कार्यरत होता. पूजन करणार्या सद्गुरुद्वयी या उच्च आध्यात्मिक पातळीच्या संत आहेत. सवत्स गायीचे पूजन सनातनच्या आश्रमातील चैतन्यमय परिसरात करण्यात आले होते. पूजा सांगणारे पुरोहितही साधना करणारे, म्हणजे साधक आहेत. हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक विधींमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, ते योग्य रितीने आणि मनोभावे केल्यास विधीत सहभागी झालेल्या घटकांना विधीतील देवतेच्या तत्त्वाचा आणि चैतन्याचा लाभ होतो.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१०.२०१८)
ई-मेल : mav.research2014@gmail.com