मराठीतील काही परकीय आणि त्यांना पर्यायी स्वकीय शब्द अन् त्यांचा वापर
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘स्वभाषाशुद्धीची आवश्यकता, मराठी भाषेमध्ये प्रचलित झालेल्या परकीय शब्दांपैकी ‘कमी’ हा फारसी शब्द आणि त्याला पर्यायी असलेले मराठीतील प्रतिशब्द’ इत्यादींविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात आणखी काही परकीय शब्द पाहू.
(लेखांक १५ – भाग २)
४. नित्य वापरातील काही परकीय शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द
(टीप : या सूत्रातील ‘४ अ’ हे सूत्र शुक्रवार, १४.१०.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.)
४ आ. ‘म्हणजे’ या अर्थाने ‘अर्थात्’ हा शब्द वापरल्यामुळे मराठी भाषा हिंदी वळणाची होत असणे : ‘म्हणजे’ हा मराठी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘अन्य शब्दांत सांगायचे तर…’ किंवा ‘याचा अर्थ…’ असा आहे. ‘अर्थात्’ हा संस्कृत शब्द आहे. त्याचा एक अर्थ ‘म्हणजे’ असा असला, तरी पूर्वीपासून मराठी भाषेमध्ये हा शब्द ‘म्हणजे’ या अर्थाने प्रचलित नव्हता. ‘गुरुजी म्हणाले, ‘‘बळी तो कान पिळी’, म्हणजे ‘जो बलवान असतो, तो दुबळ्या लोकांवर वर्चस्व गाजवतो’’, अशा वाक्यांत ‘म्हणजे’च्या जागी ‘अर्थात्’ वापरला जात नसे.
हिंदी प्रसारमाध्यमे, विशेषतः घरोघरी सातत्याने पाहिल्या जाणार्या हिंदी वृत्तवाहिन्या यांवरील हिंदी भाषेच्या प्रभावाखाली आल्यामुळे मराठीत ‘म्हणजे’ या अर्थाने ‘अर्थात्’ हा शब्द वापरण्यास आरंभ झाला. ‘आज ६ डिसेंबर, अर्थात् बाबरी मशीद पतन दिन’, अशी वाक्यरचना मराठीत आता सर्रास वापरली जाते; परंतु ही हिंदी वळणाची भाषा आहे. हे वाक्य ‘आज ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पतन दिन’, असे लिहिणे अधिक योग्य आहे. ‘अर्थात्’ या शब्दाच्या तुलनेत ‘म्हणजे’ हा शब्द वापरायलाही सोपा आहे. या दोन शब्दांच्या संदर्भातील अयोग्य आणि योग्य वाक्यरचनेचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.
४ आ १. अयोग्य वाक्य : ‘मातृदेवो भव’, अर्थात् ‘आईला देव मानावे.’
४ आ २. योग्य वाक्य : ‘मातृदेवो भव’, म्हणजे ‘आईला देव मानावे.’
४ इ. ‘पोहोचणे’ या हिंदी वळणाच्या शब्दाच्या जागी ‘पोचणे’ हा मराठी शब्द वापरणे : मराठी भाषेत सध्या ‘पोहोचणे’ हा शब्द सर्वत्र वापरला जात आहे. वास्तविक ‘पोहोचणे’ हा शब्द हिंदी भाषेतील ‘पहुंचना’ या शब्दावरून मराठीत आला आहे. मूळ मराठीत ‘पोचणे’ असा शब्द आहे. त्यामुळे आपण ‘पोचणे’ हा शब्द लिहिणे योग्य ठरते.
४ ई. ‘मनावर अंकित करणे’ या शब्दप्रयोगाच्या जागी ‘मनावर बिंबवणे’ किंवा ‘मनावर कोरणे’ हा शब्दप्रयोग वापरणे : मराठी भाषेत ‘अंकित करणे’ याचा अर्थ ‘एखाद्यावर सत्ता प्रस्थापित करणे किंवा एखाद्याला वश करणे (मानसिकदृष्ट्या स्वतःच्या कह्यात घेणे)’, असा आहे. हिंदी भाषेत ‘अंकित करना’ याचा अर्थ ‘बिंबवणे’ असा आहे; पण सध्या हिंदी भाषेच्या प्रभावामुळे मराठी भाषिक ‘मनावर बिंबवणे’ या अर्थाने लिहिण्यासाठी ‘मनावर अंकित करणे’ हा चुकीचा शब्दप्रयोग वापरू लागले आहेत. तो टाळायला हवा. मराठीत ‘मनावर बिंबवणे’ या अर्थाने ‘मनावर कोरणे’ हा शब्दही उपलब्ध आहे. त्याचाही उपयोग करू शकतो. पुढे एक अयोग्य मराठी वाक्य आणि एक योग्य मराठी वाक्य उदाहरणार्थ दिले आहे.
४ ई १. अयोग्य वाक्य : ही गोष्ट तू तुझ्या मनावर अंकित करून ठेव.
४ ई २. योग्य वाक्य : ही गोष्ट तू तुझ्या मनावर बिंबव. किंवा ही गोष्ट तू तुझ्या मनावर कोरून ठेव.
४ उ. ‘इसवी सन’ या अरबी शब्दाच्या जागी ‘वर्ष’ हा मराठी शब्द वापरणे : ‘इसवी सन’ हा अरबी शब्द असून ही कालगणना येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे. येशूच्या जन्मानंतरच्या वर्षांना ‘इसवी सन’ असे म्हटले जाते. या शब्दाऐवजी आपण मराठीत ‘वर्ष’ हा शब्द वापरावा. ‘इसवी सन २००६’ असे लिहिण्याऐवजी ‘वर्ष २००६’ असे लिहावे. यासह काही वेळा लिखाणात शतकाचा उल्लेख करावा लागतो, उदा. ‘इसवी सनाचे ६ वे शतक’. अशा ठिकाणी ‘ख्रिस्तोत्तर ६ वे शतक’ असे लिहावे. ‘इसवी सनपूर्व ५ वे शतक’ असे लिहायचे असल्यास ‘ख्रिस्तपूर्व ५ वे शतक’ असे लिहावे. ही पद्धत प्रचलितही आहे. हिंदु राष्ट्रात मात्र आपण हिंदु कालगणनेनुसार तिथी आणि कलियुग वर्ष लिहिणार आहोत.’
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)