खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून अधिक तिकीटदर आकारणी करू नये !  

  • ‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !

  • सोलापूर, पुणे, सांगली येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन !

  • दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने घेतलेल्या भेटीनंतर सोलापूर येथे प्रसिद्धीपत्रक काढले !

सोलापूर – खासगी प्रवासी वाहनांनी दीपावलीच्या काळात प्रवाशांकडून अधिक भाडे आकारू नये. प्रवाशांकडून भाडे आकारतांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निश्‍चित केलेल्या भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अशाच स्वरूपाचे प्रसिद्धीपत्रक पुणे आणि सांगली येथेही काढण्यात आले आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. किशोर जगताप यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अमरसिंह गवारे मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवरील कारवाईविषयी चौकशी केली होती. त्या वेळी त्यांनी ‘अशा प्रकारांना आळा घालू’, असे आश्‍वासन दिले होते. या भेटीनंतर वरील तिन्ही ठिकाणी परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून अधिक रकमेची तिकीट आकारणी केली जात असल्यास कार्यालयाच्या  ‘mh13@mahatranscom.in’  या संगणकीय पत्त्यावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

  • सांगली येथील तक्रारीच्या संदर्भात ८८३०७७०५५० या ‘व्हॉटसअ‍ॅप’ क्रमांकावर किंवा dyrto.10-mh@gov.in या संगणकीय पत्त्यावर संबंधित वाहनाच्या तिकिटांच्या प्रति, वाहनाचे आणि नोंदणी क्रमांकाच्या छायाचित्रासह तक्रार नोंदवू शकता, असे सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळवले आहे.
  •  पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ०२०-२६०५८०८०/२६०५८०९० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा rto.12-mh@gov.in या संगणकीय पत्त्यावर तक्रार नोंदवावी. प्रवाशांना प्रवास करतांना येणार्‍या अडचणीविषयी dycommr.enf2@gmail.com या संगणकीय पत्त्यावर तक्रार नोंदवावी.

अतिरिक्त भाडे आकारल्यास प्रवासी वाहनांवर कारवाई करू ! – विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड

कराड – खासगी वाहतूकदारांनी निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडेआकारणी केल्यास संबंधित वाहतूकदारावर मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कराड येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. सुरेंद्र भस्मे यांना दिली. दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक गावाकडे ये-जा करतात. याचा अपलाभ घेऊन खासगी प्रवासी वाहने मनमानी पद्धतीने भाडेआकारणी करतात. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांना विचारले होते.

या वेळी विनोद सगरे यांनी कराड आणि पाटण तालुक्यात खासगी गाड्यांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवायांची माहिती दिली.