साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !
आश्विन शुक्ल चतुर्थी (५.१०.२०१६) या दिवशी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने अन् कृपाशीर्वादाने भाववृद्धी सत्संगांना आरंभ झाला. (२९.९.२०२२ या दिवशी या सत्संगांना ६ वर्षे पूर्ण झाली.) सनातनच्या साधकांमधील आणि सनातनशी जोडलेल्या प्रत्येक जिवाच्या अंतरातील भक्ती अन् भाव यांची जागृती होण्यासाठी अन् प्रत्येक जिवामध्ये वास करणार्या ईश्वराला अनुभवण्यासाठी, जिवाला त्याच्या मूळ रूपाची ओळख होण्यासाठी या सत्संगांना आरंभ झाला. सर्व साधकांमध्ये भाववृद्धी करणे, एवढाच या भावसत्संगाचा उद्देश नसून ‘साधक आणि सर्व जीव यांच्यासहित संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करून या भूमातेला पुन्हा एकदा रज-तमातून मुक्त करून भूतलावर दैवी वातावरणाची निर्मिती करणे’, हा या सत्संगांचा उद्देश आहे. ‘सर्व जिवांना सुख-दुःख यांच्या पलीकडे असलेल्या चिरंतन आनंदाशी एकरूप करणे आणि मन-बुद्धीच्या पलीकडे असलेल्या ईश्वरी शक्तीला अनुभवणे, म्हणजेच पुन्हा एकदा सत्ययुग आणणे’, हेही या सत्संगांमागील उद्दिष्ट आहे. या भाववृद्धी सत्संगाचा लाभ करून घेतल्यामुळे देश-विदेशांतील साधकांमध्ये आंतरिक परिवर्तन होत आहे. सत्संगात झालेले सर्व विषय, म्हणजे साक्षात् ब्रह्मदेवाचे ज्ञानच आहे. भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून साधक भगवंताचा अखंड कृपावर्षावही अनुभवत आहेत. ती कृपा साधकांनी सत्संगात सांगितलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून कशी अनुभवली ? याविषयी त्यांनी भावसत्संगामध्ये कृतज्ञतास्वरूपात अर्पण केलेले शब्दरूपी मनोगत येथे दिले आहे.
भाग १.
१. कु. अश्विनी हनुमंत कदम (आताच्या सौ. अश्विनी खामणकर), सातारा
१ अ. स्वभावदोष उणावून गुणवृद्धी होणे : ‘पूर्वी प्रसंगानुसार माझ्यातील बरेचसे स्वभावदोष उफाळून यायचे. आता अंतर्मुख रहाणे, परिस्थिती स्वीकारणे, व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे, सकारात्मक आणि स्थिर रहाणे या कृती करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. साधकांविषयी प्रेम वाटणे, भावजागृती होणे आणि गुरुदेवांचे अखंड स्मरण करणे, या गोष्टी केवळ आणि केवळ भावसत्संग अन् गुरुमाऊलीची अपार प्रीती यांमुळे शक्य झाले.
१ आ. भाव ठेवून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करू लागल्यावर स्वतःमधील स्वभावदोष लक्षात येऊन ते न्यून करण्यासाठी प्रयत्न केले जाणे : मी लहानपणापासून साधनेत आहे, तरीही मी व्यष्टी साधना करत नसे. भावसत्संगामुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न भाव ठेवून आणि आनंदाने होऊ लागले. मला माझे स्वभावदोष आणि अहं लक्षात आले अन् त्यावर प्रयत्न करता येऊ लागले. त्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.’
२. सौ. मीनाक्षी पाटील, जळगाव
२ अ. बुद्धीचे अडथळे दूर होऊन स्वभावदोषांची जाणीव होणे आणि क्षमायाचना केल्यावर मन हलके होऊन आनंद मिळणे : ‘पूर्वी माझ्यामधील ‘पूर्वग्रहदूषितपणा, तर्कवितर्क करणे, आत्मविश्वासाचा अभाव, तुलना करणे’ या स्वभावदोषांमुळे माझ्याकडून मनाच्या स्तरावर पुष्कळ चुका झाल्या. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे पूर्वग्रहाचा किंवा तर्कवितर्क यांचा विचार मनात येताच देव मला त्याची जाणीव करून देतो. तेव्हा मी संबंधित व्यक्तीची आणि देवाच्या चरणी क्षमायाचना करते. त्यामुळे माझे मन हलके होऊन मला आनंदही मिळायला लागला आहे. केवळ आणि केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे.
२ आ. कुटुंबियांमध्ये गुरुरूप पहाता येऊन अपार कृतज्ञता वाटणे : पूर्वी माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होता. मी मायेत अडकले होते; परंतु आता माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला आहे. ‘माझे आई-बाबा, बहीण, भाऊ हे सारे माझे भगवंतच आहेत, ते माझी प.पू. गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) आहे’, असे वाटून त्यांच्याप्रती अपार कृतज्ञता व्यक्त होते.
२ इ. भावजागृतीचे प्रयत्न करतांना देवतांचे अस्तित्व अनुभवता आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार कृतज्ञता वाटणे : भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे भावजागृतीचे प्रयत्न करतांना आणि देवतांच्या चरणांना स्पर्श करतांना मला देवतांचे अस्तित्व अनुभवता येऊन माझा भाव जागृत व्हायला लागला. त्यामुळे मला प.पू. गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) अपार कृतज्ञता वाटू लागली. गुरुमाऊलीच्या कृपेने आपत्काळातही (कोरोनाच्या काळातही) मला देवतांचे अस्तित्व अनुभवता येऊ लागले आहे.’
३. श्री. महादेव जाधव, मिरज, सांगली.
३ अ. ‘घर म्हणजे आश्रम आहे’ हा भाव ठेवणे : ‘आपले घर आश्रम झाला पाहिजे’, ही भावसत्संगात सांगितलेली गोष्ट माझ्या मनाला अगदी मनापासून पटली आणि मी तसे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता घरातील वातावरण प्रसन्न झाले असून कुटुंबियांनाही माझा आधार वाटतो.
३ आ. ‘प्रत्येकामध्ये श्रीविष्णु आहे’, असा भाव ठेवून सर्वांशी मनमोकळेपणे बोलण्याचा प्रयत्न करणे : पूर्वी मी कुटुंबियांशी मनमोकळेपणाने बोलत नव्हतो. माझ्या मनात ‘कुणाविषयी पूर्वग्रह आहे का ?’, हे शोधून काढले. आता मी ‘प्रत्येकात श्रीविष्णु आहे’, असा भाव ठेवून मी कुटुंबीय आणि साधक यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतो.
४. श्री. नंदकिशोर नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४ अ. प्रत्येक कृती आणि सेवा करतांना ‘भगवंताचीच सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे आणि कृतज्ञताभाव वाढणे : ‘भावसत्संगात बोलतांना ‘समोर भगवंतच आहे’, हा भाव ठेवून बोलायला लागलो. प्रत्येक कृती आणि सेवा करतांना ‘मी भगवंताचीच सेवा करत आहे’, असा भाव ठेवल्यापासून ‘माझ्यातील कृतज्ञताभाव अन् प्रार्थना करणे’ यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे डोळे मिटून प्रार्थना केल्यावर देवाशी एकरूपता साधता येऊन देवाशी बोलता येते आणि त्याचा स्पर्शही जाणवतो. त्यामुळे मला आनंद मिळतो.
४ आ. कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त होणे : माझे कुटुंबीय साधनेत नव्हते; म्हणून पूर्वी माझ्या मनात त्यांच्याविषयी नकारात्मक विचार असायचे; पण भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे कुटुंबाच्या समवेत वागल्यामुळे नकारात्मक विचार अल्प होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हायला लागली.’
५. सौ. प्रमिला ननावरे, अकलूज
५ अ. साधनेला विरोध करणार्यांविषयीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवता येणे : ‘पूर्वी घरातील लोक साधनेला विरोध करतात’, या गोष्टीचे मला फार दुःख व्हायचे. भावसत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. त्यानंतर ‘ते मला विरोध करत नसून उलट साहाय्यच करत आहेत. ते मला सत्संगाला सोडतात आणि प्रत्येक गोष्टीत साहाय्य करतात’, हे माझ्या लक्षात आले.
५ आ. खारुताईप्रमाणे शरणागतीने सेवा करणे : आधी मला सेवा मिळाल्यावर ‘ही सेवा जमेल का ?’, अशी भीती वाटायची. भावसत्संगामुळे ‘प्रत्येक सेवा ही गुरुदेवांनी विचार करून दिली असून आपण ती सेवा खारुताईप्रमाणे शरणागतीने करायची आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
संकलक : कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०१९)
(क्रमशः)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/623012.html