तेलंगाणामध्ये हिंदु महिलांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी ‘मंगळसूत्र’ काढण्यास सांगितले !

मुसलमान महिलांना मात्र ‘बुरख्या’सह प्रवेश

भाग्यनगर – तेलंगाणामध्ये एक नवीन वाद समोर आला आहे. येथील हिंदु महिलांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी ‘मंगळसूत्र’ काढण्यास सांगितले, तर मुसलमान महिलांना ‘बुरख्या’सह परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. ही घटना १६ ऑक्टोबर या दिवशी तेलंगाणा राज्य लोकसेवा परीक्षेच्या वेळी आदिलाबादच्या पदवी महाविद्यालयात घडली. या घटनेचा व्हिडिओही ट्विटरवर प्रसारित करण्यात आला आहे. (मंगळसूत्र घातलेल्या हिंदु महिलांमुळे परीक्षा केंद्रात कुठली अडचण येते हे स्पष्ट न करता  केवळ हिंदुद्वेषापोटी अशी कृती करून हिंदूंना अवमानित करणार्‍या तेलंगाणातील राज्यकर्त्यांना हिंदूंनी सनदशीर मार्गाने विरोध करावा ! – संपादक)

१. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबच्या (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापलेल्या वस्त्राच्या) वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या २ न्यायाधिशांनी वेगवेगळा निकाल दिल्याने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एक मोठे खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२. त्यानंतर तेलंगाणात पुन्हा एकदा बुरख्याचा वाद चव्हाट्यावर आला आहे. आदिलाबाद येथील परीक्षा केंद्रावर हिंदु महिलांना बांगड्या, कानातले, गळ्यातील साखळी आणि मंगळसूत्र इत्यादी वस्तू काढण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी मुसलमान महिलांना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.

३. भाजपच्या नेत्या प्रीती गांधी यांनी याविषयीच्या व्हिडिओचा संदर्भ देत हा तुष्टीकरणाच्या राजकारणाची परिसीमा असल्याचे सांगितले. यानंतर राज्यातील इतर भाजप नेत्यांनीही ट्वीट करून तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारवर टीका केली आणि सरकार लांगूलचालनाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार ज्या राज्यात सत्तेत असेल, तेथे अशी घटना घडल्यास आश्‍चर्य ते का ?