पुणे येथे ‘सिग्नल’ बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत चालते’ या कारणाने वाहतूक पोलिसांनी २४ सिग्नल बंद ठेवले !
पुणे – ‘सिग्नल बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत चालते’ असे अनुमान काढत शहरातील विविध चौकांमध्ये लावलेले २४ सिग्नल वाहतूक पोलिसांच्या आदेशानेच बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेने लाखो रुपये व्यय करून उभारलेले सिग्नल कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शहरामध्ये ३४७ चौक असून त्यापैकी २७२ चौकांमध्ये वाहतूक नियमन करण्याकरता सिग्नल बसवण्यात आले आहेत. त्यांतील काही सिग्नल पोलिसांकडून बंद ठेवण्यात आले आहेत. काही सिग्नल जुने झाले असल्याने ते बंद आहेत; तर काही ठिकाणचे ‘सिग्नल नसल्याने वाहतूक सुरळीत होते’, असे कारण देत बंद ठेवले जातात, तर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद असतात, अशी स्थिती आहे.
महापालिकेचे विद्युत् विभागप्रमुख श्रीनिवास कंदुल म्हणाले की, पोलिसांच्या विनंतीनुसारच आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी सिग्नल उभारले जातात. ३ रस्ते एकत्र येणार्या ठिकाणी सिग्नल उभारण्यास ३ ते ४ लाख रुपये, तर मोठ्या चौकांमध्ये ७ ते ८ लाख रुपये व्यय होतात. त्याची देखभाल करण्याचे काम त्रयस्थ संस्थेला देण्यात आले आहे. (असे असेल, तर पोलीस आता कोणत्या आधारावर सिग्नलमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, असे म्हणतात ? हे अनाकलनीय आहे. पोलिसांच्या या वक्तव्याचा अभ्यास वरिष्ठांनी करावा आणि योग्य-अयोग्य काय, हे सांगावे, हीच अपेक्षा ! – संपादक)
संपादकीय भूमिकासिग्नल चालू करण्याचा निर्णयही वाहतूक पोलीस देतात आणि तेच सांगतात सिग्नल बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत होते, हे कसे ? |