मनुष्याला शतायुष्याचे वरदान देणारा ‘रसायन आहार’ घ्या !
सध्या ग्रहण केले जाणारे ‘फास्ट फूड’, ‘जंक फूड’, पाकिटातील सिद्ध अन्न, बेकरीचे पदार्थ, ‘व्हिनेगार आणि विविध ‘सॉसेस’ हे नेमके रसायनांच्या विरुद्ध काम करतात, म्हणजे ते आपली रोगप्रतिकारक्षमता न्यून करतात. सौम्य, सर्व रसयुक्त, दूध आणि तूपयुक्त, ऋतूजन्य भाज्या आणि फळे यांचा समावेश असलेला घरगुती, पारंपरिक आणि ताजा आहार, म्हणजेच ‘रसायन आहार’ होय. आजारी न पडता ज्यांना दीर्घायुषी व्हायचे आहे, त्यांनी असाच आहार घेणे आवश्यक आहे. यासंदर्भातील विवेचन या लेखाद्वारे दिले आहे.
१. रसायन आहार म्हणजे काय ?
१ अ. उतारवयातही शारीरिक क्षमता उत्तम असणारी व्यक्तीमत्त्वे ! : ‘पच्चीस साल के बुढे या साठ सालके नौजवान ?’ असे पूर्वी एका च्यवनप्राशचे विज्ञापन करण्यात यायचे. तेव्हा त्या विज्ञापनाची गंमत वाटायची. ‘बढाचढाके विधान करतात’, असे वाटायचे; पण आज असे काही किंवा त्यापेक्षाही मोठ्या वयाचे नौजवान आजूबाजूला दिसतात, तेव्हा त्यांच्याविषयी आदर वाटतो. ‘काय करणार ? चाळीशी चालू झाली. आता एकेक त्रास चालूच व्हायचे’, असे म्हणत शरिरात त्रासांना आमंत्रण देणारे रुग्ण कुठे ! प्रत्येक २ मासांनी विश्रांतीसाठी हवापालटाला परदेशी जाणारे एका राजकीय पक्षाचे तरुण नेतृत्व कुठे ? आणि ६७ व्या वर्षी १२ सहस्र फूट उंचीवरील (अल्प ऑक्सिजन असलेल्या) केदारनाथच्या गुहेत जाण्यासाठी दीड किलोमीटर चढ चढणारे पंतप्रधान मोदी कुठे ?
१ आ. आजार आणि वार्धक्य हे मनुष्यदेहाला असलेले २ शाप असणे : अशी माणसे बघितली की, लोकांना त्यांच्या बाकी दिवसभराच्या जीवनशैलीविषयी सहसा कुतूहल वाटत नाही. ‘कौनसी चक्की का आटा खाते है ये लोग ? किंवा ‘असं काय खातात ?’, असे केवळ खाण्याविषयीच प्रश्न पडतात. आजार आणि वार्धक्य (हाही एक प्रकारचा आजारच म्हणायचा) हे मनुष्यदेहाला असलेले २ शाप आहेत. या दोन्ही गोष्टी दुःख दिल्याविना रहात नाहीत. त्यामुळे ‘या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ नयेत’, असेच सगळ्यांना वाटत असते.
१ इ. तारुण्य राखता येणार्यांची जीवनशैली महत्त्वाची असणे : ‘आँटी मत कहो ना मुझे ।’ हे वाक्य स्त्रियांच्या तोंडी घालून वाढत्या वयाविषयी त्यांना असणारा तिटकारा हा नेहमी चेष्टेचा विषय केला जातो. स्वतःच्या मुलीची मोठी बहीण दिसण्याची कैक स्त्रियांची धडपड आपण आपल्या अवतीभवती अनुभवतच असतोच. (‘संतूर’ साबणाचे विज्ञापन लोकप्रिय होते ते यासाठीच) तरुण दिसण्याच्या या स्पर्धेत पुरुष अजिबात मागे नाहीत. केस रंगवून वय लपवण्याची वृत्ती स्त्री-पुरुष दोघांमध्येही दिसते. काही मोजक्या चतुर लोकांनाच तारुण्य राखण्याची कला प्राप्त झालेली असते. त्यासाठी त्यांची जीवनशैली जितकी महत्त्वाची असते, तितकाच आहारही ! यालाच ‘रसायन आहार’ म्हणतात.
१ ई. आजार आणि वार्धक्य यांना दूर ठेवणारे रसायन आचार कोणते ? : जो आहार औषध किंवा जीवनशैली, आजार आणि वार्धक्य यांना दूर ठेवायला साहाय्य करतो, त्यांना ‘रसायन’ म्हणतात. आजार आपल्याला कळतात; पण वार्धक्य म्हणजे नक्की काय ? देहाची झीज होणे, इंद्रियांच्या (५ ज्ञानेंद्रिये – नाक, जीभ, डोळे, त्वचा, कान आणि ५ कर्मेद्रिये – हात, पाय, गुद, जननेंद्रिय आणि वाणी) यांची कार्यक्षमता अल्प होणे आणि मनाच्या धैर्यादी शक्तीचा र्हास होणे, ही वार्धक्याची लक्षणे आहेत. आजकाल वयाच्या चाळिशीतच ही लक्षणे दिसायला लागतात. ती पुढे ढकलून आयुष्याचा दीर्घकाळ तरुण राहून उपभोगता यायला हवा. रसायन हेच काम करते. सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, रात्री न जागता वेळेवर झोपणे, सत्य इत्यादी धर्ममार्गांचे पालन करणे, तसेच निर्व्यसनीपणा, शाकाहार, इंद्रियसंयम, क्रोधावर नियंत्रण, निर्लाेभी वृत्ती आणि समाधानीपणा हे रसायन ‘आचार’ आहेत. हे नियम पाळले की, आजार आणि वार्धक्य यांना दूर ठेवता येते.
आपला या सदराचा विषय आहार हा आहे. आहारातील काही रसायन द्रव्यांविषयी आपण यापूर्वी वेळोवेळी विचार केला आहे. तरी येथे त्यांची थोडी उजळणी करूया आणि काही नवीन रसायन आहार बघूया.
२. ‘भारतीय गायीचे दूध आणि तूप यांचे नियमित सेवन हे सगळ्यात श्रेष्ठ रसायन आहे’, असे चरकाचार्य यांनी सांगणे
२ अ. देशी गायीचे दूध आणि तूप यांमुळे आजार अन् वार्धक्य दूर ठेवता येणे : हा लाभ मिळण्यासाठी हे दोन्ही एकत्र करून घ्यावे. कपभर गरम दूध (शीतकपाटातील गार दूध अजिबात नाही) आणि त्यात एक चमचा तूप पुरे ! ‘भारतीय’ म्हणजे नक्की कुठली गाय याविषयी लोकांमध्ये पुष्कळ गोंधळ आहे. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारतात अनुमाने ७२ जातीच्या देशी गायी होत्या. (‘त्यापूर्वी १३० हून अधिक जाती होत्या’, असे म्हणतात.) भारत हा खंडप्राय देश आहे. प्रत्येक राज्यातच नव्हे, तर राज्यातील भागांमध्येही वेगवेगळ्या गायी सापडतात. महाराष्ट्रात पश्चिम भागात खिलार, कोकणात कोकण गिड्डा, मराठवाड्यात डांग अशा बर्याच जाती आढळतात. सध्या लोकांना परिचित जात म्हणजे ‘गिर’ ! ही गुजरातमधील एक जात आहे. पुष्कळ दूध देणारी ही प्रेमळ जात आहे. थोडक्यात जर्सी किंवा होस्तन प्राणी नको. आपल्या प्रदेशातील देशी गाय चालेल. तिचे दूध-तूप हे आजार आणि वार्धक्य यांना दूर ठेवायला उपयुक्त आहे.
३. चिरतरुण रहाण्यासाठी उपयुक्त असणार्या आवळ्याचे लाभ !
३ अ. षड्रसात्मक आहार देणारा आवळा हे सर्वाेत्तम फळ असणे : ‘माणसाने नेहमी षड्रसात्मक आहार घेतला पाहिजे’, असे आयुर्वेद सांगतो. आवळ्यामध्ये आंबट आणि तुरट या चवींसह अल्प प्रमाणात तिखट, कडू आणि गोड चवही असते, म्हणजेच आवळा ५ रसांनी युक्त आहे. त्यात लवण म्हणजे खारट चव नसल्याने त्याला मीठ लावून खायची पद्धत आहे. गोड आणि आंबट असल्याने आवळा वात न्यून करतो. गोड आणि तुरट चव असल्याने ती कफालाही न्यून करते. थोडक्यात आवळा त्रिदोषक, म्हणजे शरिरातील तीनही दोषांचे संतुलन साधणारा आहे; म्हणूनच आवळा हे सर्वाेत्तम फळ आहे.
३ आ. त्रिदोषशामक आवळा पित्त न्यून करत असल्याने चिरतरुण रहायला साहाय्य होणे : पित्त हा शरिरात पचन करणारा घटक आहे. पचन करणे, म्हणजे पालट घडवणे. शरिरात जेवढे अधिक पित्त असेल, तेवढे विविध पालट वेगाने घडतात. बाल्य ते तारुण्य आणि तारुण्य ते वार्धक्य हे पालटही शरिरात पित्त अधिक असले की, जलद घडून येतात. काळे केस पांढरे होणे हे ठराविक वयात घडले पाहिजे; पण पित्त अधिक असले की, लहान वयात केस पिकतात. त्रिदोषशामक असलेला आवळा मुख्यतः पित्ताला न्यून करणारा आहे. त्यामुळेच तो लवकर वय वाढू देत नाही आणि चिरतरुण रहायला साहाय्य करतो; म्हणूनच ‘वय वाढण्यास प्रतिबंध करणार्या (वयस्थापन) औषधांमध्ये आवळा सर्वाेत्तम आहे’, असे चरक म्हणतात. रक्तवाहिन्या, केस आणि त्वचा यांचे आरोग्य टिकवण्यात आवळ्याची उपयुक्तताही अनेक संशोधनातून सिद्ध होत आहे.
४. कुटुंबातील सर्वांनी वर्षभर सेवन करता येणार्या च्यवनप्राशचे महत्त्व !
आवळ्यापासून बनणारे आणि सगळ्या जगाला सुपरिचित असणारे रसायन औषध म्हणजे च्यवनप्राश ! उत्तम पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश फुफ्फुसांची क्षमता वाढवतो. मूत्र आणि शुक्रातील वैगुण्य नष्ट करतो, तसेच हृदयाला बळ देतो. बुद्धी, स्मृती आणि कांती वाढवण्यास साहाय्य करतो. च्यवनप्राश हे कुटुंबातील सर्वांनी वर्षभर सेवन करण्याचे औषध आहे. काही जण च्यवनप्राशसमवेत दूध घेतात; पण ते चुकीचे आहे. ‘च्यवनप्राशमध्ये असणारे ‘ॲन्टीऑक्सिडंट’ गुण हे केवळ त्याच्या ‘व्हिटॅमिन सी’मुळे आहेत’, असा अपसमज होऊ शकतो.च्यवनप्राशमध्ये आवळ्यासमवेत सुमारे ४० औषधी, तूप आणि मध यांचे गुण एकत्रित आहेत.
५. अन्य रसायन आहार
५ अ. विविध शारीरिक त्रासांत कोणता आहार घ्यावा ? : आजारानंतर किंवा अन्य काही कारणांनी शरिरात विशिष्ट धातू न्यून होतात. ते धातू उत्तम (सारबान) व्हावेत; म्हणून काही विशिष्ट आहार घेण्याची आवश्यकता असते. शरिरातील रस धातू न्यून झाला, तर अशक्तपणा किंवा चक्कर येते, आवाज सहन होत नाहीत आणि गळून गेल्यासारखे वाटते. अशा वेळी आहारात डाळिंब, खडीसाखर, शतावरी, कोहळा, द्राक्षे आणि काळ्या मनुका यांचा समावेश करावा. शरिरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंब आणि खजूर खावे. मांस न्यून होऊन वजन न्यून झाले असल्यास मांसरस (सूप) आणि उडीदाचे पदार्थ खावे. हाडे, सांधे, दात आणि केस यांची दुखणी असल्यास डिंक, गहू आणि तीळ हे आहारात समाविष्ट करावे. रोगप्रतिकारक्षमता न्यून झाली असेल किंवा मेंदूचे विकार असतील, तर आवळा, बदाम, नारळ आणि कोहळा खावे.
५ आ. रोगप्रतिकारक्षमता न्यून करणारा आहार टाळा ! : परंपरागत भारतीय आहारात हे नियम सर्व ऋतूंमध्ये पाळले जातात. सध्या घेतला जाणारा ‘फास्ट फूड’, ‘जंक फूड’, पाकिटातील सिद्ध अन्न, बेकरीचे पदार्थ, ‘व्हिनेगार आणि विविध ‘सॉसेस’ हे नेमके रसायनांच्या विरुद्ध काम करतात. ते रोगप्रतिकारक्षमता न्यून करतात. त्यातील आंबट, खारट चवींच्या बाहुल्याने ते लवकर वार्धक्य आणतात. त्यामुळे आपण पारंपरिक आहाराच्या लाभांना मुकतोच, तसेच मोठ्या हानीला शरिरात स्थान देतो.
५ इ. रसायन आहारासाठी जुन्या मतांच्या आजीकडून गुरुमंत्र घ्या ! : सौम्य, सर्व रस, दूध आणि तूप यांनी युक्त, ऋतुजन्य भाज्या अन् फळे यांचा समावेश असलेला घरगुती, पारंपरिक आणि ताजा आहार, म्हणजेच ‘रसायन आहार’ होय. आजारी न पडता ज्यांना दीर्घायुषी व्हायचे आहे, त्यांनी असाच आहार घ्यावा. त्यासाठी घरातील जुन्या मतांच्या आजीकडून (आधुनिक आजीकडून नव्हे) गुरुमंत्र घ्यावा.’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : दैनिक ‘तरुण भारत’) (२४.११.२०१९)