…तर हिंदु धर्मातील धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांचे विडंबन का केले जात आहे ? – अरुण गोविल, ‘रामायण’ मालिकेतील प्रभु श्रीरामांची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते
आपली धार्मिक संस्कृती, परंपरा, श्रद्धास्थाने यांना कोणत्याही प्रकारचे वेगळे स्वरूप देण्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्या ज्या धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता आहेत, त्या जशा आहेत, तशाच ठेवणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पालट करण्याची आवश्यकता नाही, तसेच कुणीही त्यात पालट करू नये. काही चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) आणि विचारस्वातंत्र्य यांच्या नावाखाली कुणी धर्माचे विडंबन करू नये. धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांचे तोडून मोडून सादरीकरण करू नये. जर इतर धर्मातील धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांचे कुणी विडंबन करण्याचे धाडस करत नाही, तर मग हिंदु धर्मातील अशा मान्यतांचे विडंबन का केले जात आहे ?
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला ?
रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, गीता यांसारखे जे ग्रंथ आहेत, त्यांचे विडंबन स्वीकारार्ह नाही. सध्या सनातन धर्माचे विडंबन करण्याची सवय बनली आहे. देवीदेवतांचे आक्षेपार्ह भित्तीपत्रक (पोस्टर) बनवणे, अभद्र भाषेत बोलतांना दाखवणे, असे करण्याचा आणि आमच्या (हिंदूंच्या) धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला ?
(साभार : दैनिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, १७.१०.२०२२)