६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिने वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करण्यासाठी आल्यावर काही कालावधीनंतर ‘मला आतापर्यंत काय शिकायला मिळाले ?’, याचा मी स्वतः आढावा घेतला. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने हे आत्मनिवेदन त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. भवसागर तारून नेणारी साधनारूपी नाव पैलतिरी जाण्यासाठी भगवंताप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी करणे आवश्यक असणे
मला भवसागर पार करण्यासाठी साधनारूपी नावेची आवश्यकता आहे. ही नाव ‘माझ्यातील ईश्वराप्रती भाव, भक्ती आणि श्रद्धा अन् माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न’ यांनी सिद्ध होणार आहे. नावेचा (साधनेचा) पाया भक्कम झाला, तर कुठल्याही परिस्थितीत मला स्थिर रहाता येणार आहे. माझी ही नाव केवळ आणि केवळ जगताचे पालन करणार्या भगवंताच्या हातात आहे. भगवंत मला भवसागरातून तारून पैलतिरी नेणार आहे. माझी त्याच्यापर्यंत पोचण्याची तळमळ वाढायला हवी. माझ्यात त्याच्याप्रती श्रद्धा वृद्धींगत व्हायला हवी.
२. मायेच्या विचारांत राहून साधना करता येणे अशक्य !
एक व्यक्ती एकाच वेळी दोन नावांमधून प्रवास करू शकत नाही. त्याच प्रकारे आपण मायेच्या विचारांमध्ये राहून साधना करू शकत नाही. आपण एक पाय मायेच्या नावेत आणि दुसरा पाय साधनेच्या नावेत ठेवला, तर आपली स्थिती असंतुलित होईल. केवळ साधना केल्यानेच, म्हणजे केवळ एकाच नावेतून प्रवास केल्यावर आपल्याला गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) भवसागरातून तारून नेणार आहेत.
हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आपणच आमच्या नावेला दिशा देता. हे गुरुदेवा, मी असमर्थ आहे. आपण मला साहाय्य करता. गुरुदेवा, आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– गुरुदेवांची, कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), गोवा. (२१.७.२०२२)