प.पू. दास महाराजांना भेटण्याची इच्छा असतांना दासनवमीच्या दिवशी त्यांना भेटण्याची संधी मिळणे
१. प.पू. दास महाराजांना भेटण्यासाठी हनुमंतरायांना प्रार्थना करणे
‘२३.२.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराजांचा वाढदिवस होता. त्यापूर्वी मला ‘प.पू. दास महाराज यांना भेटावे’, असे वाटत होते; परंतु काही कारणास्तव मला त्यांच्याकडे जाता येत नव्हते. तेव्हा मी हनुमंतरायांना प्रार्थना केली, ‘हे हनुमंतराया, श्रीरामप्रभूंवर तुझी पुष्कळ श्रद्धा होती. तू त्यांचा दास बनून सेवा केलीस. मग माझ्याकडूनही दास बनण्यासाठी अपेक्षित असे प्रयत्न करवून घे ना ! तूच माझ्यामध्ये भगवंताप्रती श्रद्धा वाढवू शकतोस, म्हणजे मला प.पू. महाराजांना भेटण्याची संधी मिळेल.’
२. पू. रेखा काणकोणकर यांनी प.पू. दास महाराज यांच्याकडे जातांना साधिकेला समवेत घेऊन जाणे
२५.२.२०२२ या दिवशी दासनवमी होती. सायंकाळी मी महाप्रसाद ग्रहण करत होते. तेवढ्यात कु. सोनाली खटावकर सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर यांना प.पू. दास महाराजांनी बोलावले असल्याचा निरोप द्यायला आली. पू. रेखाताई स्वयंपाकघरातून भोजनकक्षात माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, ‘‘चल, आपण प.पू. दास महाराजांकडे जाऊया.’’ तेव्हा ‘माझी प्रार्थना हनुमंतरायापर्यंत पोचली’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.
३. प.पू. दास महाराज यांच्या खोलीत गेल्यावर वेगळ्याच विश्वात असल्याचे जाणवणे
‘पू. रेखाताईंच्या माध्यमातून देवच (श्री अन्नपूर्णादेवीच) मला प.पू. दास महाराजांना भेटण्यासाठी न्यायला आला’, असे मला वाटले. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच येत होते. ‘साधकांच्या मनातील विचार देवापर्यंत कसा पोचतो ?’, हे माझ्या लक्षात आले. महाराजांच्या खोलीत जाईपर्यंत आपोआपच माझ्याकडून ‘जय गुरुदेव’ हा नामजप होत होता.
त्यांच्या खोलीत पाऊल टाकताच ‘मी वेगळ्याच विश्वात आहे आणि मी भूमीवर नसून तरंगत आहे’, असे मला जाणवत होते. प.पू. दास महाराजांनी आम्हाला पेढा दिला. परात्पर गुरु डॉक्टरांनी दासनवमीच्या निमित्ताने प.पू. महाराजांना फळे पाठवली होती. त्यातील केळे त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून दिले. श्रीरामस्वरूप परात्पर गुरुदेव आणि हनुमंतराय स्वरूप प.पू. दास महाराज यांच्याकडून आम्हाला प्रसाद मिळाला. श्री अन्नपूर्णादेवीमुळेच (पू. रेखाताईंमुळे) मला संतसहवास लाभला. त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |