मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप !
पुणे – शहरात १७ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता झालेल्या प्रचंड पावसाने कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर या भागांतील नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, घरांमध्ये पाणी घुसले, रस्त्यांची स्थितीही भयानक झाली होती. वानवडी भागात आलेल्या पुरामुळे रस्त्यावर उभी असलेली चारचाकी नागरिकांच्या डोळ्यांदेखत वाहून गेली. रात्री साडेनऊ ते साडेदहा वेळेत पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ८१ मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. या भागातून रात्री १२ वाजेपर्यंत २५ हून अधिक कुटुंबियांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भ्रमणभाष करून साहाय्याची याचना केली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपति मंदिरातही पावसाचे पाणी शिरले. गणपति मंडळाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत मंदिरात शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे काम चालू होते. या व्यतिरिक्त श्रीमंत भाऊ रंगारी गणपति ट्रस्टच्या संग्रहालयातही पाणी शिरले होते. रस्त्यावरून वहाणार्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, रस्ता ओलांडणार्या नागरिकांचा तोल जात होता. या वेगामुळे रस्त्याच्या कडेला लावलेल्या अनेक दुचाकीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.