(अ)ज्ञानींचा विरोध !
मध्यप्रदेश राज्यात वैद्यकीय शिक्षण हे इंग्रजीऐवजी हिंदी भाषेतून देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यंतरी ‘वैद्यकीय व्यवहार हिंदी भाषेतून करावेत आणि इंग्रजी भाषेचे परकीय जोखड झुगारून द्यावे’, असे विधान एका भाषणात केले होते. त्यांच्याच भाषणातून प्रेरणा घेत स्थानिक आधुनिक वैद्य सर्वेश सिंह यांनी औषधाच्या चिठ्ठीवर (‘प्रिस्क्रिप्शन’वर) नेहमीप्रमाणे ‘RX’ असे संबोधन न लिहिता ‘श्रीहरि’ असे लिहिले. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर सिंह यांनी त्या चिठ्ठीत पूर्णपणे हिंदी भाषेतच लिखाण केले होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही त्यांच्या या कृतीचे समर्थनच केले; पण औषधाच्या चिठ्ठीत देवाचे नाव आले आणि विरोध झाला नाही तरच नवल ! नेहमीप्रमाणे तथाकथित पुरोगामी आणि धर्मांध, तसेच उदारमतवादी अशांनी त्यांना पुष्कळ विरोध केला. त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. जणू काही त्यांनी एखादा मोठा अपराधच केला आहे. खरेतर आधुनिक वैद्यांनी अशा प्रकारे लिहून ‘गृहमंत्र्यांच्या आवाहनालाच प्रतिसाद दिला आहे’, असे म्हणता येईल. मग त्यांचे चुकले कुठे ? अशा प्रकारच्या लिखाणाद्वारे हिंदी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचाच आधुनिक वैद्यांनी लहानसा प्रयत्न केला; पण भारताचे दुर्दैव हेच की, अशी सकारात्मक बाजू कधीच पाहिली जात नाही. केवळ आणि केवळ हिंदुत्वाच्या द्वेषापोटीच आकस घेत विरोधाचे हत्यार उपसले जाते.
देवतेचे नाव औषधाच्या चिठ्ठीवर लिहिले, तर चुकले कुठे ? आरोग्य रक्षणाची देवता म्हणून भारतात धन्वन्तरीची पूजा केली जाते. वैद्यकशास्त्रामध्ये कार्यरत असणारे मोठमोठे शस्त्रकर्म चिकित्सक किंवा तज्ञसुद्धा एखाद्या रुग्णाच्या कठीण स्थितीत स्वतःचे ज्ञान आणि अनुभव असूनही हतबल होतात अन् रुग्णाच्या नातेवाइकांना ‘भगवंतावर सर्वकाही सोपवा. आता आमच्या हातात काही नाही’, असे सांगतात. कित्येकदा औषधोपचार किंवा शस्त्रकर्म यांनी बरे न झालेले रुग्ण केवळ भगवंताच्या आराधनेने निरोगी आणि सुदृढ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशांना भगवंताला शरण जाणे समजते; पण ‘श्रीहरि’ शब्दाला विरोध करणार्यांना यामागील तत्त्वज्ञान लक्षात येत नाही. यावरून त्यांच्या बुद्धीमत्तेची कीव करावीशी वाटते. स्वतःला ‘ज्ञानी’ समजून एकीकडे ‘अज्ञान’ पाजळण्याचाच हा केविलवाणा प्रयत्न आहे; पण हे त्या (अ)ज्ञानींना काय समजणार ? आज भारतात हिंदु धर्म किंवा संस्कृती यांना जोपासण्याचा कुणीही प्रयत्न केला, तरी त्याला टीकेलाच सामोरे जावे लागणे, हे एकेकाळी हिंदुत्वाचा दीपस्तंभ म्हणवल्या जाणार्या भारतासाठी अवमानास्पद ठरत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारत देशाला पुन्हा एकदा हिंदुत्वाचा दिशादर्शक करणे अत्यावश्यक आहे !