सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !
अष्टविनायकांना प्रार्थना !स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महड येथील वरदविनायक, थेऊर येथील चिंतामणी, लेण्याद्रिचा गिरिजात्मज, उत्तम वर देणारा ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपति सर्वांवर सदैव कृपा करो ! |
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी थेऊर येथील ‘चिन्तामणि’ गणपतीचे घेतले दर्शन !
‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक (मोरगाव येथील मयुरेश्वर, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, रांजणगाव येथील महागणपति, ओझर येथील विघ्नेश्वर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, महड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्वर) यांचे दर्शन घ्यावे. या दौर्याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील ‘महागणपति’ आणि थेऊर येथील ‘चिन्तामणि’ यांचे दर्शन घेतले.
१. मंदिरासमोर पोचताच धो धो पाऊस पडणे
‘रांजणगावहून थेऊरला दर्शनाला जातांना आभाळ भरून आले होते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ थेऊर येथील मंदिरासमोर पोचताच धो धो पाऊस पडला.
२. मंदिरातील पुजार्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून गणपतीची आरती करून घेणे
थेऊर येथील पुजार्यांना समजले की, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प घेऊन गणपतीच्या दर्शनाला आल्या आहेत. तेव्हा त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून गणपतीची आरती करून घेतली.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१६.१०.२०२२)
थेऊर येथील ‘चिन्तामणि’ गणपतीच्या स्थापनेचा इतिहास आणि मंदिरातील श्री गणेशमूर्ती !
१. स्थान
‘पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात थेऊर हे गाव असून त्याच्या तिन्ही बाजूंनी मुळा-मुठा नदी आहे. नदीच्या डोहात ‘कदंब’ तीर्थ आहे. त्याला ‘चिंतामणी तीर्थ’ असेही म्हणतात. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे श्रद्धास्थान म्हणून थेऊरचा गणपति प्रसिद्ध आहे.
२. ‘चिन्तामणि’ गणपतीच्या स्थापनेचा इतिहास !
ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीचे कार्य करू लागल्यावर नारदांनी ब्रह्मदेवास ‘चिन्तामणि’ गणपतीची उपासना करण्यास सांगितले. ‘क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरोधक’, या चित्ताच्या पाच भूमिका असून त्यांना प्रकाशित करणारा ‘चिन्तामणि’ असतो. याच्या उपासनेने चित्ताच्या या पाचही अवस्था लयास जाऊन शांती लाभते.
२ अ. चित्ताच्या पाच भूमिका
‘क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरोधक’, या चित्ताच्या पाच अवस्थांचा अर्थ पुढे दिला आहे.
१. क्षिप्त : चंचलता
२. विक्षिप्त : गोंधळलेली अवस्था
३. मूढ : तीव्र अहंभाव
४. एकाग्र : चित्त एका ठिकाणी रहाणे
५. निरोधक : स्वभावदोष विरहित अवस्था
ब्रह्मदेवाने मुळा-मुठा नद्यांच्या पात्रांत एका पायावर उभे राहून ॐ काराची उग्र अनुष्ठाने केली. त्यामुळे ॐ कार प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवास आशीर्वाद दिला. नंतर ब्रह्मदेवाने सर्व देवतांच्या उपस्थितीत या क्षेत्री श्री गणेशमूर्तीची यथासांग प्रतिष्ठापना केली. मूर्तीच्या गळ्यात मोठ्या भक्तीभावाने चिंतामणी रत्नांचा हार घालून त्या गणेशाचे ‘चिन्तामणि’ असे नामकरण केले.
या क्षेत्री गाणपत्य मुनी कौंडिण्य यांनी एक लक्ष दूर्वा वाहून या ‘चिन्तामणि’ गणपतीची उपासना केली होती. चिंचवडचे महान गाणपत्य साधू मोरया गोसावी यांनी येथील अरण्य क्षेत्रात चिन्तामणीचे उग्र तप केल्यामुळे चिन्तामणीने त्यांना व्याघ्र रूपात दर्शन दिले होते.
३. मंदिर आणि मंदिरातील श्री गणेशमूर्ती !
चिंचवडच्या श्री चिंतामणी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी थेऊर येथील मंदिराचे बांधकाम केले. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. नंतर श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी येथील सभामंडपाचे काम केले. मंदिराचा सभामंडप अती भव्य असून कलाकुसरीने नटलेला आहे. ‘चिन्तामणि’ गणेशाची लाल रंगाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तिचे मुख पूर्वेकडे आहे. मांडी घालून मखरात बसलेला ‘चिन्तामणि’ भक्तांना आशीर्वाद देत आहे. या गणपतीच्या डोळ्यांत रत्ने आणि माणके आहेत. बाजूने शेषनागाची प्रभावळ आहे.
४. पूजा आणि उत्सव
मंदिरात प्रतिदिन षोडशोपचारे पूजा होते. भाद्रपद मासात येथे मोठी यात्रा भरते.’