हिंदुद्वेषी खदखद !
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी काश्मीर, काश्मिरी हिंदु आणि काश्मिरी पंडित यांच्या विरोधात विधाने करून हिंदुद्वेष व्यक्त करणे, हे नित्याचेच झाले आहे. १६ ऑक्टोबर या दिवशी एका कार्यक्रमात ते त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘जोपर्यंत काश्मीरसमवेत न्याय होत नाही, तोपर्यंत येथे होणार्या काश्मिरी हिंदूंच्या हत्या थांबणार नाहीत.’’ ‘कलम ३७० रहित करून ३ वर्षे झाली, तरीही या हत्या थांबत नाहीत’, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी निषेध करत सांगितले, ‘‘काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची दुकाने बंद झाली आहेत. दगडफेकही थांबली आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असून वेगवान विकास चालू आहे; पण यात अब्दुल्लांसारख्या नेत्यांनी जनाधार गमावल्याने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते अशी घृणास्पद विधाने करत आहेत.’’ कलम ३७० रहित झाले खरे; पण हे पचनी पडले, तर ते अब्दुल्ला कसले ? ‘३७० कलम पुन्हा लागू व्हायला हवे’, ही त्यांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे ते नव्या परिस्थितीसमवेत जुळवून घेऊच शकत नाहीत. याचा राग कुठे काढायचा, तर त्यासाठी काश्मिरी हिंदू आहेतच. काश्मिरी हिंदू म्हणजे अब्दुल्ला यांच्यासाठी आयते कोलीत मिळाल्यासारखेच आहे. कलम ३७० रहित झाल्यापासूनच्या ३ वर्षांमध्ये तेथील परिस्थिती पुष्कळ पालटली आहे. आधीच्या तुलनेत काश्मिरी हिंदूंच्या हत्या पुष्कळ न्यून झाल्या आहेत. केंद्रशासनाकडूही तेथे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
आतंकवाद्यांचा बीमोड करण्यात आल्याने ती समस्या काही प्रमाणात अल्प झाली आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीनगर आणि जम्मू-काश्मीर येथे राष्ट्रध्वज अत्यंत सुरक्षितपणे फडकावण्यात आला, ही अभिमानाची गोष्ट आहे. कलम ३७० रहित होणे, ही भारतासाठी ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे. आज सर्वत्र भारतप्रेम उफाळून येत असल्याने पाकप्रेमाचे निशाणच कुठे उरलेले नाही. अर्थात् हे सर्वच अब्दुल्ला यांना खुपते. त्यामुळे ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ याप्रमाणे बेताल विधाने करत सुटायचे, हेच त्यांना जमते; पण असे असले, तरी ‘जनता दूधखुळी नाही’, हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांच्या विधानाला जनता आता जुमानणार नाही; कारण आता जम्मू-काश्मीर खर्या अर्थाने प्रगतीशील होत आहे. तेथील निवडणुकांमध्ये सहभागी होऊन जनतेने पंतप्रधानांच्या विकास कार्यक्रमांचे समर्थन केले, हे हिंदुद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यायला हवे. ‘कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला आता ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देऊन जनतेची आतुरता लवकर पूर्ण करावी, ही अपेक्षा ! तसे झाल्याविना अब्दुल्ला यांच्यासारख्यांची तोंडे गप्प बसणार नाहीत, हेच खरे !
संपादकीय भूमिकाकेंद्रशासनाने काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून दिल्यासच फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांची तोंडे गप्प होतील ! |