प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून वाटाण्याच्या अक्षता !
|
मुंबई, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – प्रवाशांची लूटमार रोखावी, यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सुटण्याच्या ठिकाणी शासनमान्य तिकिटाचे दरपत्रक लावण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. यावर कार्यवाही व्हावी, यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना त्यासाठी पत्रही पाठवले आहे; परंतु ही कारवाई केवळ प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीपत्रक देण्यापुरतीच होत आहे, असे दिसून आले.
‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !
भरमसाठ तिकीटदर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सचे जनविरोधी रूप उघड !
‘एस्.टी. गाड्यांच्या तुलनेत दीडपट तिकीटदर आकारण्याची शासनाकडून सवलत देण्यात आली असतांना सण-उत्सव, तसेच उन्हाळ्याची सुटी आदी काळात दुप्पट-तिप्पट तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची अक्षरशः आर्थिक लूट चालू आहे. हे नियंत्रित करण्यासाठी सरकारचा ‘मोटर वाहन विभाग’ असतांना मागील अनेक वर्षे हे प्रकार उघडपणे चालू आहेत ? आर्.टी.ओ. कार्यालयांना हे प्रकार का दिसत नाहीत ? याविषयी ‘सनातन प्रभात’ने विशेष मोहिम राबवून विविध जिल्ह्यांतील आर्.टी.ओ. कार्यालयांमध्ये जाऊन याविषयी माहिती घेतली. त्यातून अवैध दरवाढीसह अन्यही अनेक गंभीर प्रकार लक्षात आले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून याविषयीची वृत्ते आम्ही क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. यातून आर्.टी.ओ., एकंदरीत प्रशासकीय यंत्रणा आणि शासनकर्ते यांनी यांतील त्रुटी, तसेच भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढून सर्वसामान्यांची लूटमार थांबवावी, ही अपेक्षा !
अधिक दर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई नाहीच !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी विविध जिल्ह्यांत घेतलेल्या माहितीनुसार परवाना नसतांना प्रवासी वाहतूक करणे किंवा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणार्या किरकोळ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली; परंतु शासनाने दिलेल्या दरानुसार अधिक दर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई होतच नसल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावरही अधिक तिकीटदर आकारणार्या खासगी टॅव्हल्सवरील कारवाई वगळता अन्य कारवायांची आकडेवारी देण्यात आली आहे; परंतु अधिक दर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाईची आकडेवारी नाही.
* सांगली येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. गिरीश पुजारी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळी यांची भेट घेतली.
* सातारा येथील प्रतिनिधी श्री. राहुल कोल्हापुरे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची भेट घेतली.
* सोलापूर येथील प्रतिनिधी श्री. किशोरकुमार जगताप यांनी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांची भेट घेतली.
व्हिडिओ पहा : #Diwali Exclusive : Extravagant fare hikes by private buses during festivals !
* रत्नागिरी येथे श्री. प्रीतम नाचणकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांची भेट घेतली.
या भेटींनंतर निष्पन्न झाले की, केवळ रत्नागिरी येथील कार्यालयाकडून काही प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या आणि तिकीट बुकींग सेंटर येथे दरपत्रक लावण्यात आले आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये केवळ प्रसिद्धीपत्रके काढून खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांना सूचना देण्यात आल्या आहेत.